Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र स्पेशल रिपोर्ट : सराईत गुन्हेगाराच्या भेटीसाठी पुढाऱ्यांची गर्दी

स्पेशल रिपोर्ट : सराईत गुन्हेगाराच्या भेटीसाठी पुढाऱ्यांची गर्दी

Subscribe

सुशांत किर्वे । नाशिक

सराईत गुन्हेगार तथा भाजप पदाधिकारी राकेश कोष्टीवर हल्ला झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी पुढार्‍यांची मांदियाळी दिसून आली. पूर्ववैमनस्य आणि स्वसंरक्षणार्थ हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, खूनाचा गुन्हा दाखल असलेल्या या कोष्टीला भेटायला राजकीय पुढारी येत असल्याने त्याच्यासह त्याच्या साथीदारांचे मनोबल वाढून पुन्हा टोळीयुद्धाची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी पुढार्‍यांनीही आता अशा गुन्हेगारांना दूर ठेवण्याची गरज आहे. तसे झाले तरच गुन्हेगारी कमी होईल.

- Advertisement -

नाशिकमध्ये काही महिन्यांपासून सातत्याने टोळीयुद्धाचा भडका सुरू आहे. या टोळ्यांमधील सदस्यांना एकमेकांच्या जीवाची भीती असतानाही, वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या टोळ्या सक्रीय राहतात. त्यातच अलिकडच्या काळात वैमनस्यात वाढ झाल्याने अनेक गुन्हेगार स्वसंरक्षणासह दुसर्‍याचा काटा काढण्यासाठी गावठी कट्टे व चॉपरसारख्या धारदार हत्यारे वापरत आहेत. अंबडमधील बाजीप्रभू चौकात १६ एप्रिल रोजी सराईत गुन्हेगार तथा भाजप पदाधिकारी राकेश कोष्टीवर झालेल्या गोळीबारामागे हप्तेखोरीचे कारण देण्यात आले होते. प्रत्यक्षात हा हल्ला टोळीयुद्धातूनच झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या हल्ल्याचा कट रचणार्‍या किरण शेळकेने तशी कबुली दिली.

\२०१७ मध्ये पंचवटीतील संजयनगरात (वाघाडी) जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याची हत्या झाली होती. ज्वाल्या १ ऑक्टोबर २०१५ रोजी बेपत्ता झाला होता. तशी तक्रार पंचवटी पोलिसांत दाखल होती. तब्बल २० महिन्यांनंतर पोलीस तपासात ज्वाल्याचे अपहरण करून जाळून टाकत हत्या झाल्याचे पुढे आले होते. या प्रकरणात राकेश कोष्टीचा सहभाग होता. ज्वाल्या हा किरणचा जवळचा मित्र होता. मित्राच्या हत्येतील संशयितांना शिक्षा व्हावी, यासाठी किरणने बरेच प्रयत्न केले. परंतु, राजकीय पाठबळामुळे कोष्टी जामीनावर बाहेर आल्याने किरणने जया दिवेच्या मदतीने कोष्टीचा काटा काढण्याचे ठरवले. दरम्यान, जया व राकेशमध्येही तणाव वाढल्याने त्यांच्यातील वैमनस्य वाढले. त्याला राजकीय पुढार्‍यांनी खतपाणी घातल्याने शहरात गँगवारचा भडका उडाला. कोष्टी हल्लाप्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातून सात हल्लेखोरांना अटक करत त्यांच्याकडून हल्ल्यातील शस्त्रे जप्त केली.

कायद्याचे ज्ञान अन् पुढार्‍यांच्या मदतीमुळे गुन्हेगारीत वाढ
- Advertisement -

अनेक गुन्हेगारांना कायद्याचे ज्ञान आहे. त्यांना कायद्यातील पळवाटाही माहिती आहेत. त्यामुळे एखादा गंभीर गुन्हा केल्यानंतर काही काळ तुरुंगात राहून ते बाहेर येतात. तोपर्यंत नागरिकही घटना विसरून गेलेले असतात, असा त्यांचा समज असतो. शिवाय, गुन्हेगार पुन्हा राजकारण्यांच्या आशीर्वादाने गुंडगिरी सुरू करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

टोळीयुद्धाला पुढार्‍यांचे खतपाणी

कोष्टीवर हल्ला झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी त्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येताना पोलिसांना दिसून आले. कोष्टी हा सराईत गुन्हेगार असतानाही राजकीय पक्षांचे पदाधिकारी त्याला भेटत होते. यानिमित्ताने सराईत गुन्हेगार आणि राजकीय पदाधिकार्‍यांचे लागेबांधे समोर आले. या गुन्हेगारांच्या माध्यमातून राजकारणी आपला हेतू साध्य करतात. पुढार्‍यांमुळे मनोबल वाढून गुन्हेगार जीवघेणा हल्ला करतात. पुढार्‍यांचाच पाठिंबा असल्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळताना अनेकदा पोलिसांचेही हात बांधले जातात. लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी म्हणून गुन्हेगारांमधील वैमनस्य दूर केले पाहिजेे. तसे झाल्यास टोळीयुद्ध थांबून गुन्हेगारी नियंत्रणात येईल.

तरुणाईला बिघडवताहेत पुढारी

अनेक पुढारी तरुणाईला आपल्या हाती ठेवण्यासाठी चिकन-मटनासह दारुच्या पार्ट्या देतात. त्यातून हेच तरुण बेकायदेशीर कामे करण्यास तयार होतात. त्यांना आपल्या नेत्याचा एकेरी भाषेत उल्लेख व अपशब्द बोललेले आवडत नाही. असे कुणी बोलले तर ते थेट त्यांच्यावर हल्ला करतात, हा आजवरचा नाशिक शहरातील गुन्हेगारीचा इतिहास आहे. लोकप्रतिनिधींनी तरुणाईला निर्व्यसनी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे तर दूर प्रत्यक्षात मात्र ते स्वतःच व्यसनांचे चोचले पुरविताना दिसतात.

पोलीस ठाण्यासाठी मागणी मग वाढीव पोलिसांसाठी का नाही

 नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने पोलीस दलातील मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे. मात्र, मर्यादित मनुष्यबळात पोलिसांना पेट्रोलिंग, बंदोबस्त, व्हीआयपी सुरक्षा, पोलीस कारवाया कराव्या लागतात. परिणामी, अनेक भागात पोलीस गस्त नसते, गुन्ह्याचा तपास लवकर होत नाही, पोलीस जागेवरच नसतात, अशा तक्रारी नागरिक करतात. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि पोलीस दलातील मनुष्यबळ वाढीसाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अनेक लोकप्रतिनिधी फक्त पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी पुढे आल्याचे दिसून आले. वास्तव काही वेगळेच आहे. नाशिक शहराची लोकसंख्या २१ लाखांहून अधिक आहे. त्या तुलनेत शहर पोलीस दलात अवघे साडेतीन हजार मनुष्यबळ आहे. पोलिसांची ड्युटी दिवसरात्र आहे. प्रतिबंधात्मक कारवायांसह गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस उपलब्ध होत नाहीत. परिणामी, अनेक गुन्हे प्रलंबित राहतात. शिवाय, ही संधी साधून गुन्हेगार अधिक गुन्हे करतात.

राकेश कोष्टी हल्लाप्रकरणात हल्लेखोरांकडून तीन पिस्तूल व काडतुसे जप्त केली. हल्लेखोरांनी भितीपोटी व पूर्ववैमनस्यातून कोष्टीवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. जीवघेण्या हल्ल्यांसह विविध गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांना खुद्द पुढार्‍यांचे अभय असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. : विजय ढमाळ, तपासी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा

- Advertisment -