कडाक्याच्या थंडीतही योगाथॉन उपक्रमाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कडाक्याची थंडी, सूर्याची कोवळी किरणं, नामस्मरणाने एकामागोमाग केले जाणारे सूर्यनमस्कार आणि आरोग्यासह सूर्याच्या उपासनेसाठी चाललेला आरोग्य यज्ञ नाशिककरांनी अनुभवला तो जल्लोषपूर्ण वातावरणात झालेल्या 'योगाथॉन-२०१९' या अनोख्या उपक्रमाच्या निमित्ताने.

Yogathon
योगाथॉनला नाशिककरांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

कडाक्याची थंडी, सूर्याची कोवळी किरणं, नामस्मरणाने एकामागोमाग केले जाणारे सूर्यनमस्कार आणि आरोग्यासह सूर्याच्या उपासनेसाठी चाललेला आरोग्य यज्ञ नाशिककरांनी अनुभवला तो जल्लोषपूर्ण वातावरणात झालेल्या ‘योगाथॉन-२०१९’ या अनोख्या उपक्रमाच्या निमित्ताने. यात शहरातील तब्बल ७०० मुली-महिला सहभागी झाल्या होत्या, त्यातील ६३० सहभागी सदस्यांनी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले.

शहरातील श्री. डी. एम. पगार हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सुयोजित व्हेरिडियन व्हॅली येथे रविवारी (१० फेब्रुवारी) योगाथॉनचा उपक्रम पार पडला. शंखनादाने या उपक्रमाला मंत्रमुग्ध वातावरणात प्रारंभ झाला. त्यानंतर पूरक व्यायान व नंतर सलग १२ सूर्यनमस्कारांचे एक अशी ९ आवर्तने करण्यात आली. अत्यंत नेटक्या पद्धतीने झालेल्या या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, सहायक पोलिस आयुक्त माधुरी कांगणे, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. मनोज चोपडा, रोहिणी नाईक, उपक्रमाच्या ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. नमिता कोहोक उपस्थित होते. १०८ सूर्यनमस्कार झाल्यानंतर शेवटच्या सत्रात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

स्वानंदी वालझाडे या विद्यार्थिनीने रिदमिक योगाचे अप्रतिम सादरीकरण केले. त्यानंतर स्वयम पाटील या दिव्यांग विद्यार्थ्याला त्याच्या जलतरणातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. एस.डी.एम.पी. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार यांनी प्रास्ताविकातून नाशिककरांच्या आरोग्यासाठीचा हा योगयज्ञ असल्याचे सांगितले. आयोजिका डॉ. स्वाती पगार यांनी योगाथॉन व सूर्यनमस्कारामागील शास्त्रीय व वैद्यकीयदृष्ट्या माहिती दिली. तर आयोजिका डॉ. प्रणिता गुजराथी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. जयश्री सूर्यवंशी, संदीप चिंचोलीकर, ललित जाधव, व्यंकटेश पाटील, अनिल निकम, मनिष हिरे, दीपक पाटील, भूषण वाणी, शीतल जाधव, श्रद्धा राठोड, सरोज निकम, शुभदा जगदाळे, तृप्ती वाणी, कविशा पाटील, श्वेता देशपांडे, डॉ. मनीष पवार, चतुर नेरे आदी प्रयत्नशील होते.

Yogathon1

सूर्यनमस्कारांतून पळवा हृदयरोग – डॉ. तांबे

भल्या पहाटेची वेळ असूनही नाशिककरांचा उदंड प्रतिसाद हा आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देतो आहे, असे सांगत आमदार डॉ. तांबे म्हणाले की, योग आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही सूर्यनमस्कारांतून हृदयाशी संबंधीत सर्व आजार दूर राहत असल्याचे दाखले दिले आहेत. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे थेट हृदयाशी नातं सांगणारा आणि नातं निर्माण करणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.