Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक सेंट फ्रान्सिस शाळेची मुजोरी सुरूच; १२ विद्यार्थ्यांचे दाखले रोखले

सेंट फ्रान्सिस शाळेची मुजोरी सुरूच; १२ विद्यार्थ्यांचे दाखले रोखले

Subscribe

नाशिक : शहरातील सेंट फ्रान्सिस, राणेनगर शाळेने 12 विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला अडवल्याची तक्रार शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडे पालकांनी केली आहे. तसेच नाशिक पॅरेट्स असोसिएशनचे नीलेश साळुंखे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्रनाथ कदम यांची भेट घेवून शाळेवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाकाळात शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून शाळा विद्यार्थ्यांची अडवणूक करत आहे. राणे नगर व तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस शाळेविषयी पालकांनी तक्रारी केल्यानंतर या दोन्ही शाळांची चौकशी करण्यात आली. परंतु, चौकशी समितीला कुठलेही कागदपत्र उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे शाळा दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची मान्यता शासनाने काढून घ्यावी, असा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना यापूर्वीच पाठवला आहे. अशा परिस्थितीत इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याची तक्रार केली आहे. यात जय गुज्जर, द्विश्टी तेजवानी, विवेक शिरनाथ, प्रतीक भोर, प्रशांत येवले, आर्यन खैरनार, अरमान पटेल, करन पठाण, साहिल शेख, कशफ पठाण, सिध्दी सोनवणे, अहाद सिमना या 12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पालकांनी सोमवारी (दि.18) माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांची भेट घेतली. शाळेवर कायदेशीर कारवाई करुन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे मागणी पालकांनी केली. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर शाळेसमोर आंदोलन करण्याचा इशारा नाशिक पॅरेट्स असोसिएशनचे नीलेश साळुंखे यांनी दिला आहे.

मुख्याध्यापकांना जबाबदार धरू

- Advertisement -

गुणपत्रक व दाखल्याअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल, असे आदेश शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी सेंट फ्रान्सिस शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. तसेच याबाबत 7 जुलै 2022 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार विद्यार्थ्यांची गुणपत्रक व दाखल्यांसाठी अडवणूक करु नये, या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -