ST worker strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परतीच्या प्रवासाचं ‘दिवाळं’

बस थांब्यावर पोहोचलेल्या लहान मुलांसह महिलांचे प्रचंड हाल, चाकरमान्यांना मनस्ताप

st workers stricke msrtc merger report cant disclosed says maharashtra government ST Mergers nnext hearing on 11 march

वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि.७) मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्याने नाशिक विभागातील सर्व १३ आगारांमधील बससेवा ठप्प झाली आहे. या संपामुळे एसटी महामंडळाच्या भरवशावर गावी गेलेल्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल सुरू आहेत.

दिवाळी सुटीनिमित्त गेल्या आठवड्यात गावाकडे गेलेल्या चाकरमान्यांनी रविवारच्या सुटीचा आनंद घेऊन सोमवारी लवकर परतीचं नियोजन केलं होतं. मात्र, मध्यरात्री अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने गावाकडून निघालेल्या अथवा शहरातून गावाकडे परतणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. यातल्या बहुतांश प्रवाशांना बस थांब्यावर आल्यानंतर संप सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अधिक मनस्ताप सहन करावा लागला. यात लहान मुलांसह महिलांचे प्रचंड हाल झाले.

खासगी वाहतुकदारांची दिवाळी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप खासगी वाहतुकदारांच्या चांगलाच पथ्यावर पडला. प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय नसल्याचे पाहून मनमानी पद्धतीने भाडेआकारणी सुरू होती. अनेक मार्गांवर दुप्पट, तिप्पट भाडे घेतले गेल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. या सर्व घडामोडींमध्ये एकट्या नाशिक विभागात एसटी महामंडळाचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता उत्पन्न घटल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळासमोर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.