उत्पादन शुल्क विभागानं पकडला लाखोंचा अवैध मद्यसाठा

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर केली कारवाई

अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीचे नवनवी प्रकरणं उघडकीस आणणार्‍या उत्पादन शुल्क विभागानं आज पुन्हा एक धडक कारवाई करत तब्बल ३० लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. विभागीय उपायुक्त अर्जून ओहोळ आणि अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

उत्पादन शुल्क विभागाचे सुनील देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या गुरुकृपा हॉटेलसमोर ही कारवाई केली. या ठिकाणी उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले दादरा नगर हवेली इथला मद्यसाठा लपवण्यात आला होता. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कामिम अहमद आणि दीपक रोकडे या दोघांना अटक केलीय. गेल्या महिनाभरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाने सायखेडा गावात कारवाई करत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.