घरमहाराष्ट्रनाशिकआईने केला महागड्या सायकलीचा हट्ट पूर्ण अन् चोरट्यांनी मारला डल्ला

आईने केला महागड्या सायकलीचा हट्ट पूर्ण अन् चोरट्यांनी मारला डल्ला

Subscribe

पोलीस अधिकार्‍यांच्या प्रसंगावधानतेमुळे मुलाला मिळाली सायकल परत

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले सटाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे रात्री गस्तीवर असताना एक अगदी छोटी पण अगदीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी रात्री गस्तीवर असताना केलेले काम अनेकांना किरकोळ वाटेलही, मात्र ज्या कुटुंबियांच्या बाबतीत हे घडले त्या देवरे कुटुंबियांसाठी शिंदे यांनी बजावलेले कर्तव्य फार मोलाचे आहे.

सटाणा शहरातील शिवाजी रोडलगत देवरे कुटुंबीय भाड्याच्या खोलीत राहतात. अजय देवरे हा एकुलता एक अकरा वर्षांचा मुलगा असलेल्या देवरे दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची. काही दिवसांपूर्वी वडिलांचेही निधन झाल्याने आई धुणीभांडी करून दोन सदस्यांचे कुटूंब चालवते. लॉकडाऊनमध्ये धुणीभांडी करण्याचे कामही बंद झाल्याने प्रचंड आर्थिक संकटात असतांनादेखील अजयच्या सर्व मित्रांनी सायकल घेतल्याने अजयनेही आईकडे सायकलचा हट्ट धरला.

- Advertisement -

अजयने आपल्या आईकडे नवी सायकल घेण्यासाठी दोन महिन्यांपासून रडत रडत तगादा लावल्याने सोन्याचे मनी मोडून दोन दिवसांपूर्वी साडेसहा हजार रुपयांची नवी सायकल घेत पितृछत्र हरपलेल्या अजयचा हट्ट आईने पूर्ण केला. आईने नवी सायकल घेऊन दिल्याने खुश झालेल्या अजयने रात्री उशिरापर्यंत शिवाजी रोडवर सायकल चालविण्याचा आनंद लुटला आणि अनावधानाने आनंदाच्या भरात अजय सायकल घराबाहेर उभी करून घरात निघून गेला.

त्याच रात्री प्रभारी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे शहरात गस्त घालत असताना पोलीसचौकी परिसरात दोन युवक एक नवी सायकल घेऊन जात असताना शिंदे यांना दिसले. शिंदे यांनी दोघांना हटकले असता दोघांनी सायकल सोडून पळ काढला. नवी कोरी सायकल चोरीची असल्याचा संशय आल्याने देवेंद्र शिंदे यांनी परिसरातील माजी नगरसेवक छोटू सोनवणे यांना सायकलीबाबत कळविले असता, सोनवणे यांनी ती सायकल अजय देवरे या बालकाची असून एक दिवसापूर्वीच त्याच्या आईने त्याला घेऊन दिल्याचे सांगितले.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे व माजी नगरसेवक छोटू सोनवणे यांनी अजय देवरे यांच्या घरी जात जमा असलेली सायकल त्यांच्या हवाली केली. २४ तासांपूर्वी घेतलेली सायकल चोरी झाल्यानंतरही देवेंद्र शिंदे यांनी परत आणून दिल्याने अजयच्या आईने अश्रूंना वाट मोकळी करून देत शिंदे यांचे आभार मानत तुम्ही केलेले काम तुमच्यासाठी लहान असेल पण आमच्यासाठी तुम्ही बजावलेलं कर्तव्य हे आभाळाएवढं असल्याचे सांगत आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -