चोरी गेलेली साडेतीन लाखांची बाईक सापडली विहिरीत!

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Sport bike found in well

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावांतर्गत असलेल्या चिचदरा येथून वैभव सुनील शेळके या तरुणाची अज्ञात चोरट्याने 3 लाख 40 हजार रुपये किंमतीची स्पोर्ट्स बाईक चोरुन पोबारा केला होता. ही घटना मंगळवारी (दि. 24) पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर ही बाईक गुरुवारी (दि. 16) पिंपळगाव देपा येथील एका विहिरीत आढळून आली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वैभव शेळके हा तरुण निमगाव पागा (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील राहणार असून त्याच्याकडे (एमएच 03, डीटी 2101) या क्रमांकाची स्पोर्ट्स बाईक होती. तो बोटा (चिचदरा) येथील मामाकडे आला होता. 24 ऑगस्टला ही बाईक घरासमोरच लावली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्पोर्ट्स बाईक चोरुन पोबारा केला होता. सकाळी झोपेतून उठल्यावर बाहेर येवून पाहिले असता तर बाईक नव्हती. त्यामुळे हा तरुण घाबरुन गेला होता. त्याने परिसरात बाईकचा सगळीकडे शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही.

अखेर घारगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही स्पोर्ट्स बाईक पिंपळगाव देपा परिसरातील पांडुरंग उंडे यांच्या विहिरीत आढळून आली. पंचायत समिती सदस्य किरण मिंढे, पांडुरंग उंडे, तुकाराम उंडे, हरिभाऊ खरात, बन्सी कढणे, संपत मधे, अशोक मधे, गौतम पवार, संतोष पवार, पोलीस पाटील शिवप्रसाद दिवेकर आदिंनी दोरीच्या सहायाने ही स्पोर्ट्स बाईक विहिरीतून बाहेर काढण्यास मदत केली.