घरमहाराष्ट्रनाशिकमुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात दत्ता पाटील लिखित ‘दगड आणि माती’

मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात दत्ता पाटील लिखित ‘दगड आणि माती’

Subscribe

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानंतर दुसर्‍यांदा मिळाला बहुमान

नाशिक : आजच्या पिढीचे प्रायोगिक रंगभूमीवरचे प्रयोगशील नाटककार दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या ‘दगड आणि माती’ या एकांकिकेची मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (मराठी)च्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. मराठी नाट्यक्षेत्रातील नाटककार, समीक्षक यासह अनेक दिग्गजांच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या या एकांकिकेत इतिहास नसलेल्या गावाची अनोखी समकालिन गोष्ट दत्ता पाटील यांनी विलक्षण शैलीने मांडली आहे. मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी असलेले दत्ता पाटील यांच्या दुष्काळग्रस्तांची व्यथा मांडणार्‍या ‘हंडाभर चांदण्या’ या एकाकिकेचाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
गेल्या दोन दशकांपासून प्रायोगिक रंगभूमीवर वेगळ्या धाटणीचे नाट्यलेखन करून नावलैकीक मिळविलेल्या दत्ता पाटील यांचे ‘हंडाभर चांदण्या’ हे नाटक खूप गाजले आहे. महाराष्ट्र फाऊन्डेशनसह अनेक मानाचे पुरस्कार पटकावलेले हे नाटक यापूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे. कणकवली येथून प्रकाशित होणार्‍या रंगभूमीला वाहिलेल्या ‘रंगवाचा’ या नियतकालिकाच्या एकांकिका विशेषांकात ‘दगड आणि माती’ ही त्यांनी अलीकडेच लिहिलेली एकांकिका प्रसिद्ध झाली. ती वाचून ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार, समीक्षण व अभ्यासक राजीव नाईक, ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी, दिग्दर्शक अतुल पेठे यांच्यासह अनेक दिग्गजांनी या एकांकिकेचे भरभरून कौतुक केले. ग्रामीण समकालिन वास्तव खुबीने मांडलेले हे नाटक आजचे ग्रामीण भागातील तरूण पिढीची विखंडीत मानसिकता, वर्तमानविभ्रम, आत्मवंचनेतून वाढत जाणारी शरणागत अवस्था विलक्षण संवादातून, घटनांमधून अधोरेखित करते. आपल्या छोट्याशा गावाला इतिहासच नसल्याने तो शोधून काढण्यासाठी जीवाचे रान करणार्या समकालिन नायकाची ही कथा जागतिक पातळीवरील वास्तवाच्या विशाल आकाशाला गवसणी घालते.
मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या दिव्तीय वर्षासाठी नाट्यसाहित्य विषयाकरिता एकुण नऊ एकांकिका असून, त्यातील आठ गेली चार पाच दशके मराठी रंगभूमीवर नावाजल्या आहेत. त्यात सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, दत्ता भगत, संजय पवार, प्रा. दिलीप परदेशी, प्रल्हाद जाधव, प्रदीप राणे, चंद्रशेखर फणसाळकर यासारख्या दिग्गज लेखकांच्या गाजलेल्या एकांकिकाही आहेत. यात आजच्या पिढीचा लेखक दत्ता पाटील याच्याही नव्या एकांकिकेचा समावेश झाल्याने समांतर रंगभूमीवरील नाट्यकर्मींनी आनंद व्यक्त केला आहे. या एकांकिकेसह पाटील यांनी लिहिलेल्या काही एकांकिका व नाटकांचा संग्रह लवकरच शब्दालय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे.
..
आपलं लेखन हे अभ्यासाचा विषय होणं, ही बाब सुखावणारी तर असतेच, शिवाय जबाबदारीही वाढविणारी असते. ग्रामीण भागातल्या तरूण पिढीची विखंडीत मानसिकता, विभ्रमावस्था आणि जागतिक मंचावरून त्याच्यापर्यंत पोहोचणार्‍या वर्तमान स्थितीचं खरेखोटेपण, सांकेतिक सुप्त अजेंडे यांचा उकल न करता येऊ शकण्याचं असामर्थ्य यातून ग्रामीण भाग एकुणच व्यक्तिमत्वहीन होऊन गेलाय. यापैकी अशाच एका गावातील युवकाची व त्या गावाची ही गोष्ट आहे. जी युवकांना नक्कीच समकालाशी जोडून ठेवेल.
– दत्ता पाटील, लेखक

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -