पोलिसांच्या नाकावर टिच्चून टोळक्याचा धुमाकूळ; पंजाब कॉलनीत वाहनांसह घरांवर दगडफेक

चौघांना अटक

मुलीला पळवून लावल्याच्या कारणावरुन टोळक्याने नाशिकरोड परिसरातील पंजाब कॉलनीत रविवारी (दि.२०) मध्यरात्री २ वाजेदरम्यान कोयते, काठ्या व दगड घेऊन टोळक्याने दहशत निर्माण केली. शिवाय या टोळक्याने दगडफेक करुन घरांसह खिडक्या आणि वाहनांचे नुकसान केले. तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन करत टोळक्यातील चौघांना अटक केली.

याप्रकरणी मीनल भगवान बोरनारे यांनी केलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील अभिनव गोपाळ कुर्‍हे, आकाश सुभाष इंगळे, विकी रामभाऊ वरखडे व यश ऊर्फ प्रकाश राजेंद्र पगारे या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हातात कोयते, काठ्या, दगड घेऊन मीनल बोरनारे यांच्या पंजाब कॉलनीतील शर्मा कॉटेज घराजवळ आले. अतुल बोरनारे याने मुलीला पळवून लावल्याच्या संशयावरुन संशयितांनी संगनमताने बोरनारे यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारल्या, तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दरवाजास बाहेरुन कडी लावून खिडक्यांवर दगडफेक करत काचा फोडल्या. परिसरात दहशत निर्माण व्हावी, यासाठी संशयित परिसरात उभ्या असलेल्या वाहनांवरही तुफान दगडफेक केली. याप्रकरणी मीनल बोरनारे यांनी तक्रार दाखल करताच टोळक्याच्या मुसक्या आवळण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले. पोलिसांनी काही तासांत चौघांना अटक केली. यातील तिघांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. विकी वरखेडेवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गोपाळ कुर्‍हेवर पंचवटी आणि आकाश इंगळेवर उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहेत.