नाशिक : श्रावण महिन्यांत त्र्यंबकेश्वर नगरीत होणारी भाविकांची गर्दी ही संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेतील गर्दीपेक्षा कमी असली तरीही, दरवर्षी श्रावणात त्र्यंबकेश्वर शहरातील व्यवस्था कोलमडते आणि स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने किमान स्थानिकांच्या वाहनांना वगळून नियोजन करावी, जेणेकरुन अडवणूक थांबेल अशी आग्रही मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तिर्थस्थळ असल्याने त्र्यंबकेश्वरी श्रावण महिन्यांत भाविकांची गर्दी वाढते. त्र्यंबकेश्वर लहान गाव असल्याने येथील नियोजन करताना प्रशासनाला अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. त्र्यंबकेश्वर येथे होणार्या गर्दीच्या आकडेवारीचा वस्तुनिष्ठ अभ्यास केल्यास साधारणतः २५ वर्षापूर्वी त्र्यंबक-नाशिक रस्ता हा अरुंद होता. त्यातच अनेकदा एसटी बसेस अचानक बंद पडून अभूतपूर्व वाहतूक कोंडी व्हायची. त्या दोन दशकांपूर्वीच्या घटनेचा धसका घेत प्रशासनाकडून आजही तिसर्या श्रावणी सोमवारचे नियोजन करताना त्र्यंबकेश्वरात तीन दिवस प्रवेश बंद केला जातो.
२५ वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात आज मोठा फरक आहे, हे प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे. कारण त्र्यंबक-नाशिक रस्ता हा चौपदरी झाला आहे. रस्ता प्रशस्त आहे मध्ये दुभाजकही आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही. अनेक वर्षांपासून तिसर्या श्रावणी सोमवारी त्र्यंबक-नाशिक हा राज्य महामार्ग वाहनांसाठी तीन दिवस बंद केला जातो. भाविकांची वाहने खंबाळे, तळेगाव येथे रोखली जातात. काही किलोमीटरवर वाहने रोखून तेथेही नियोजन होत नसल्याने त्याचा त्रास वाहतुकीला होतो. नियोजनाच्या दृष्टीने वरवर हे योग्य वाटत असले तरी त्याचा त्रास स्थानिकांना तसेच, या रस्त्यावरुन अन्यत्र निघालेल्या प्रवाशांना होत असतो. मुळात त्र्यंबकेश्वरजवळ खुली जागा असताना एवढ्या लांब भाविकांची रोखणे, पूर्वसूचना न देता राज्यमार्ग बंद करणे योग्य नसल्याच्या भावना स्थानिकांनी माय महानगरशी बोलताना व्यक्त केल्या. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी निदान आतातरी याप्रश्नी गांभीर्याने लक्ष्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
त्र्यंबकचा तिसरा श्रावणी सोमवार हा काही राष्ट्रीय सण नसल्याने त्यादिवशी सार्वजनिक सुटी वगैरे असा काही प्रकार नसतो. साहजिकच त्यावेळी शाळा, कंपन्या, उद्योगव्यवसाय सुरू असतात. त्यामुळे नाशिकला जाणारे विद्यार्थी, चाकरमाने, नोकरदार, व्यावसायिक यांना प्रवास करावाच लागतो. हेही अधिकार्यांनी लक्षात घेतले पाहिजे. यापुढे नियोजनाच्या नावाखाली स्थानिक वाहनांना वेढीस धरले जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. श्रावणात नियोजनासाठी विशेष पोलीस बंदोबस्त लावला जात असताना वाहनांना प्रवेश देऊ नका या सूचनेचे पालन करताना चेक पॉइंटवर सरसकट वाहने रोखून स्थानिकांना वेठीस धरले जाते.
विशेषतः तिसर्या श्रावणी सोमवारसाठी तीन दिवस जे नियोजन केले जाते ते स्थानिकांसाठी तापदायक असते. चेकपोस्टच्या ठिकाणी हुज्जत घालत बसावी लागते. वाहनचालक, प्रवाशी स्थानिक असल्याची खात्री करण्यासाठी ओळखपत्र बघावे. श्रावण मास पासचे वाटप सर्वांना होत नाही. त्यातही काही व्यक्ती वशिल्याने पास मिळवून गैरव्यवहार करतात, अशी ओरड होते. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र सक्षम पुरावे पुरेसे असताना विशेष पास कशासाठी, याचाही संबंधित यंत्रणेने विचार केला पाहिजे. यासाठी अधिकार्यांनी प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वरात जाऊन वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे, अशी भावनाही त्र्यंबकवासियांकडून व्यक्त होत आहे.
एण्ट्री पास आणि वशिलेबाजी
त्र्यंबकेश्वर शहरासह परिसरातील नागरिक, विद्यार्थी, चाकरमानी व नोकरदार, व्यावसायीक हे रोज त्र्यंबक नाशिक प्रवास करत असतात. त्यांना तिसर्या श्रावणी सोमवार नियोजनाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर तोडगा म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांकडून पास छापून घेतले जातात व श्रावण मास यात्रा नावाखाली शे-पाचशे पास वाटून स्थानिकांची व्यवस्था केली आहे असा देखावा निर्माण केला जातो. त्यातही सदर पास तिसर्या श्रावणी सोमवारसाठी नसतात. सदर पास कोणाला मिळतात, ते कोणाकडे मागायचे, याचा काही थांगपत्ता सर्वसामान्य नागरिकांना नसतो. प्रशासनाकडून याबाबत कोणतेही आवाहन केले जात नाही. प्रशासकीय यंत्रणेशी मधूर संबंध असलेल्या भाग्यवंतांना हे पास मिळवतांना अडचण येत नाही परंतू सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होतात. शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, स्थानिक नागरिकांची वाहने, औषधोपचार व वैद्यकीय उपचारासाठी त्र्यंबक-नाशिक प्रवास करणार्या नागरिकांची वाहने सदर नियोजनाचे नांवाखाली अडवून त्रास दिला जातो असा कायमचा अनुभव आहे.
स्थानिक नागरिक प्रशासनाला नेहमीच सहकार्य करत असतात. त्यामुळे प्रशासनानेही स्थानिकांच्या भावना विचारात घेतल्या पाहिजे. सुरुवात म्हणून मुख्य दिवस वगळता अन्य दोन दिवस नियोजनात थोडा बदल करण्यास काय हरकत आहे? त्यावरुन परिस्थिती लक्षात येईल. : स्वप्निल पाटील, नागरिक, त्र्यंबकेश्वर