किराणा मालाची टपरी अज्ञातांनी टाकली जाळून; कारण अद्याप अस्पष्ट

सटाणा : बुंधाटे- कळवण रस्त्यावर डांगसौंदाणे पोलीस दुरक्षेत्रा समोर असलेल्या दुकानाला मंगळवारी (दि.१४) मध्यरात्री समाजकंटकांनी आग लावली. या आगीत अडीच लाखांच्या मुद्देमालासह दुकान जळून खाक झाले आहे. याप्रकरणी दुकानमालक योगिता गोपालदास बैरागी यांनी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व योगिता बैरागी यांच्या फिर्यादीनुसार, बुंधाटे येथील माजी उपसरपंच नंदूदास बैरागी यांची मुलगी योगिता बैरागी यांची कळवण डांगसौंदाणे रस्त्यावर आदिवासी विकास महामंडळाच्या सोसायटी गोडाऊनजवळ किराणा व कोल्ड्रिंक्स व्यवसायाची लोखंडी टपरी आहे. या ठिकाणी त्यांचा रसवंतीचेसुद्धा व्यवसाय आहे. दुकानापासून बैरागी यांचे घर हाकेच्या अंतरावर असून, रात्री टपरीच्या मागील बाजूने समाजकंटकाने या दुकानात आग लावली. मध्यरात्री सुमारास बुंधाटे येथील शशिकांत जगताप हे कळवण रस्त्याने बाहेरगावहून आले असता त्यांना या दुकानातून धूर बाहेर येताना दिसल्याने त्यांनी बैरागी कुटुंबाला उठवत घटनेची माहिती दिली.

बुधवारी (दि.१५) दुपारी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण पाटील यांनी आपले स्थानिक कर्मचारी उपनिरीक्षक जीभाऊ पवार, पोलीस हवालदार जयंतसिंग सोळंकी, निवृत्ती भोये, दिपक सोनवणे यांचे समवेत भेट देत जळीत दुकानाचा पंचनामा केला. यावेळी सहा.पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी घटनेबाबद्दल स्थानिक परिसराची माहिती घेत विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली किंवा नाही याची खातरजमा केली. या आगीत या दुकानातील सुमारे अडीच लाखांचा किराणा, कोल्ड्रिंक्स, स्टेशनरी मालासह फ्रीज, व दुकानाचे फर्निचर जळून खाक झाल्याने दुकानमालक योगिता बैरागी यांनी याप्रकरणी सखोल चौकशी होऊन आरोपी पकडण्याची मागणी पोलिसांकडे केली.