शाळांचा अजब प्रकार, शंभर टक्के निकालासाठी कच्चा विद्यार्थ्यांचे प्रवेशच रद्द

सतरा नंबरचा फॉर्म भरण्याचा शाळांचा अजब निर्णय

नाशिक : पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यापासून नववीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अचानक वाढले आहे. दुसरीकडे, दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून अभ्यासात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांना नववीतच नापास करण्याची शहरातील शक्कल शाळांकडून लढवली जात आहे. नापास विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरण्याचा आग्रह करत शाळा त्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर ढकलत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बारावीपाठोपाठ दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. दहावीच्या निकालात बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. यामागील कारणे शोधली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. अभ्यासात कच्च्या विद्यार्थ्यांना शाळेकडून नववीतच नापास केले जाते. दहावीत ते बसत नाहीत म्हणजे निकालावर परिणाम होत नाही. पण नववीत नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसू न देता थेट दहावीत १७ नंबरचा फॉर्म भरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर शाळेबाहेर राहुन अभ्यास कसा करतील, अशी भिती पालकांना वाटू लागली आहे. शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने तब्बल 35 विद्यार्थ्यांना नववीत नापास केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता विद्यार्थ्यांच्या आयुष्याची चिंता वाटू लागली आहे. तर शाळेने त्यांना एकप्रकारे बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअरच टांगणीला लागले आहे.

१७ नंबर फॉर्मविषयी काय नियम आहे ?

बोर्डाच्या परीक्षेसाठी खासगीरित्या प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी बोर्डाच्या विभागीय कार्यालयांकडून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. या कारणास्तव शाळा विद्यार्थ्यांना दाखला हातात टेकवून १७ नंबरचा फॉर्म भरण्याचा सल्ला देतात.

कुठल्याही विद्यार्थ्यास शाळेतून काढून टाकता येणार नाही. पालकांनी शाळा सोडल्याचा दाखला मागितला तरच देणे बंधनकारक आहे. परंतु, १७ नंबरच्या नावाखाली विद्यार्थ्यास शाळेबाहेर ठेवणार्‍या शाळांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. : मच्छिंद्र कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, नाशिक