घरमहाराष्ट्रनाशिकगंभीर दुष्काळाला सरकारी अनास्थाच कारणीभूत

गंभीर दुष्काळाला सरकारी अनास्थाच कारणीभूत

Subscribe

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची टिका

पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळ आहे. रोजगार हमी, पाणीपुरवठा, चारा छावण्यांबाबत उपाययोजना राबवण्यात सरकारची अनास्थाच कारणीभूत आहे. विशेषत: रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी असतानाही कामे झालेली नाहीत. आचारसंहितेचा बाऊ करून केवळ वेळ मारून नेली असल्याची टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्या पथकांनी दुष्काळी भागांचा पाहणी दौरा सुरू केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. थोरात यांनी गुरुवारी (दि.१६) मालेगाव, चांदवड, नाशिक तालुक्यातील दुष्काळी गावांना भेटी दिल्या. तसेच सिन्नर तालुक्यात उभारलेल्या चारा छावण्यांना भेट दिली. त्यानंतर ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. थोरात म्हणाले, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. पूर्वी धान्य आणि चार्‍याचा दुष्काळ असायचा. आता चारा आणि पाण्याचा दुष्काळ आहे. सरकारने छावण्या सुरू केलेल्या आहेत. चारा छावण्या सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी होत आला. छावणी चालवण्यासाठीचा खर्च मोठा आहे; परंतु अद्याप एक रुपयाही छावणी चालकांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यावरून राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याचे स्पष्ट दिसते, असे आमदार थोरात म्हणाले. यावर्षी दुष्काळाची भीषणता अधिक होती, याची जाणीव सत्ताधारी आणि प्रशासनाला होती.

- Advertisement -

आचारसंहितेचा बाऊ करत सत्ताधारी आणि प्रशासनाने याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे यंदाचा दुष्काळ हा सरकारी अनास्थेमुळे निर्माण झाल्याची टीका काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. नाशिक जिल्ह्यात या वर्षात ३० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. सरकारसाठी ही शरमेची बाब आहे. मागच्या दुष्काळामुळे शेतकरी कर्ज फेडू शकले नाहीत. यंदाही शेतकर्‍यांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे सरकारने कर्जमाफी द्यायला हवी. मात्र, नाशिकमध्ये बँकांकडून सक्तवसुली केली जात आहे. एकूणच या परिस्थिती संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी उत्तर महाराष्ट्र दुष्काळ समिती समन्वयक विनायक देशमुख, आमदार निर्मला गावित, आमदार सुधीर तांबे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

विखेंबाबत २३ नंतर बोलणार

काँगे्रस नेते राधाकृष्ण विखे यांच्याविषयी थोरात म्हणाले, निवडणुका संपलेल्या आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. आम्ही शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेत आहोत. याबाबत मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊ. त्यामुळे सध्या तरी राजकारणावर भाष्य करणार नाही. विखेंबाबत २३ तारखेनंतर बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते म्हणाले, पक्ष देईन ती जबाबदारी स्वीकारेन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -