घरमहाराष्ट्रनाशिकधान्य किराणा व्यापाऱ्यांचा बंद अखेर मागे

धान्य किराणा व्यापाऱ्यांचा बंद अखेर मागे

Subscribe

बाजार समिती सभापतींच्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

एक टक्का सेस वसुलीच्या मुद्यावरून चार दिवसांपासून धान्य, किराणा व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर रविवारी (दि.१३) उशिरा मागे घेण्यात आला. बाजार समिती सभापती आणि व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीत सभापती देवीदास पिंगळे यांनी सेसप्रश्नी लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १ डिसेंबरपासून धान्य व्यापाऱ्यांकडून १ टक्का सेवा शुल्क वसूल केले जात आहे. मात्र, या सेवा शुल्क वसुलीला नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेने विरोध करत शरदचंद्र पवार मार्केट यार्डात बेमुदत बंद पुकारला होता. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्हा उपनिबंधकांनी बंद मागे घेण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. मात्र, व्यापारी आंदोलनावर ठाम होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.१२) संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी पत्रकार परिषद घेऊन ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत बंद मागे न घेण्याचा पवित्रा घेतला होता. आंदोलनामुळे धान्य तुटवडा होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन सभापती पिंगळे यांनी रविवारी (दि. १४) व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेतली. यात सभापती पिंगळे यांनी व्यापाऱ्यांशी सविस्तरपणे चर्चा करून सेसप्रश्नी लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. तोपर्यंत बंद मागे घ्यावा, असेही आवाहन केले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी बंद मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

व्यापारी व बाजार समिती यांची संयुक्त बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाली. सभापती देवीदास पिंगळे यांनी सेसप्रश्नी योग्य तो तोडगा काढू, असे अश्वासन दिल्यामुळे आम्ही बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे
– प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना

 

धान्य आणि किराणा व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सेसप्रश्नी लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही देत बंद मागे घेण्यास सांगितले. व्यापाऱ्यांनीही त्यास प्रतिसाद देत बंद मागे घेतला आहे. आता व्यापाऱ्यांनी आपापला व्यवसाय सुरू करावा.
– देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -