घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेच्या कारवाईविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

महापालिकेच्या कारवाईविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Subscribe

मालमत्ता सील करण्याच्या कारवाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांसह अभ्यासिकांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधी भवनासमोर केले आंदोलन

नाशिक महापालिकेने आपल्या मिळकतींचा गैरवापर होत असल्याचे कारण पुढे करत शहरातील काही अभ्यासिकांनाही टाळे ठोकले आहे. पालिकेच्या या कारवाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांसह अभ्यासिकांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी, ६ मे रोजी राजीव गांधी भवनासमोर आंदोलन केले. पालिकेने चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या अभ्यासिकांवर कारवाई करू नये, अशी मागणीही शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांसह महापौरांकडे करण्यात आली.

महापालिकेच्या विविध मिळकतींचा व्यावसायिक, तसेच गैरवापर होत असल्याची बाब उच्च न्यायालयात निदर्शनास आल्यानंतर पालिकेने तातडीने अशा मिळकती ताब्यात असलेल्या संस्थांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर काही मिळकतींना पालिकेने सील केले होते. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात विविध संस्थांचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी सोमवारी पालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. त्यात अण्णासाहेब मुरकुटे वाचनालयाचे अध्यक्ष मनीष बस्ते, माजी नगरसेवक बळीराम ठाकरे, सुर्वे वाचनालयाचे विश्वस्त राजू देसले, अॅड. तानाजी जायभावे, रंजन ठाकरे आदींचा सहभाग होता. या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेत त्यांना न्यायालयाच्या आदेशाबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापौरांचीही भेट घेतली. वाचनालयांप्रमाणेच चांगल्या स्थितीतील व्यायामशाळांचीदेखील तितकीच गरज असल्याने, कारवाई करताना सारासार विचार व्हावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

- Advertisement -

महापालिकेने रविवारी शहरात केलेल्या कारवाईत खासगी जागेवरील पंडितराव खैरे अभ्यासिका, तसेच सिडकोतील सरकारच्या जागेवरील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयदेखील पालिकेने सील केले होते. ही चूक लक्षात येताच पालिकेने तातडीने सील काढून घेतले. मात्र, सर्व अटी-शर्थींची पूर्तता होऊनही पालिकेने पंडीत कॉलनीतील अण्णासाहेब मुरकूटे वाचनालयावरही पालिकेने कारवाई केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बाहेर बसून अभ्यास करावा लागला. तसेच, बहुतांश विद्यार्थ्यांच्या नोट्स वाचनालयातच अडकून पडल्याने, त्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

सर्वेक्षण केल्यानंतरच व्हावी कारवाई

महापालिकेने कारवाईपूर्वी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करण्याची गरज आहे. त्यानंतरच अयोग्य मिळकती ताब्यात घ्याव्यात. ज्या ठिकाणी चांगले काम सुरू आहे, त्यांना यातून वगळावेत. – अॅड. तानाजी जायभावे, माजी नगरसेवक

- Advertisement -

सील करण्याचा कोणताही आदेश नाही

अभ्यासिका सील कराव्यात, असा कोणताही आदेश न्यायालयाने दिलेला नाही. एक समिती गठीत करून सर्व्हेक्षणानंतरच कारवाईचे निर्देश आहेत. मात्र, प्रत्यक्षात समितीविनाच कारवाई सुरू आहे. परीक्षेचे दिवस लक्षात घेता पालिकेने ही कारवाई तातडीने थांबवावी. – रंजन ठाकरे, अध्यक्ष, महात्मा वाचनालय

सोमवारी दिवसभरात सील केलेल्या मिळकती

३८ – नाशिकरोड
२९ – पश्चिम
७३ – पूर्व विभाग
३५ – पंचवटी
२६ – सातपूर
५७ – नवीन नाशिक
२५८ – एकूण मिळकती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -