वर्षअखेरीस ‘सुंदर नारायण’चे दर्शन होणार

आजतागायत बहुतांश काम पूर्ण होत असल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत मंदिराचे दक्षिणेकडील काम पूर्णत्वाकडे आले असून, उत्तरेकडील काम २५ टक्के पूर्ण झाले

नाशिक : धार्मिक अधिष्ठान असलेल्या मंदिरांच्या शहरातील पुरातन मंदिरांपैकी एक असलेल्या सुंदरनारायण मंदिराचे काम आता पूर्णत्वाकडे येत असून, येत्या डिसेंबर अखेरपर्यंत नाशिककरांना सुंदर नारायण मंदिराचे नवे रुपडे बघावयास मिळेल, अशी महत्त्वपूर्ण माहिती ‘आपलं महानगर’कडे पुरातत्व विभागाने दिली.

नाशिक शहरात गोठाकाठी असलेल्या या प्राचिन मंदिराचा जिर्णोद्धार १७५६ साली गंगाधर चंद्रचुड यांनी केेला होता. परंतु, कालांतराने पर्यावरण, हवामानातील बदल आणि काळानुरूप इतर काही कारणांमुळे मंदिराची झीज होऊन ते धोकादायक स्थितीत आले होते. त्याची पडझडही सुरू झाली होती. अशा स्थितीत मंदिराची विटंबना रोखून त्याची पुन्हा दुरुस्ती, डागडुजी करण्यात यावी, नव्याने जिर्णोद्धार करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्याचा विचार करून २०१७ साली केंद्र सरकारच्या वतीने पुरातत्व विभागाला १२ कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार कामही सुरू झाले. मात्र, २०१७ मध्ये सुरू झालेले हे काम आज पाच वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याने नाशिककरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे चौकशी केली असता मंदिराचे काम सुरू झाल्यानंतर मंदिराच्या गर्भगृहाशेजारी असलेल्या विद्युत डीपीमुळे तब्बल एक वर्ष कामात अडथळे आल्याचे सांगण्यात आले. ही डीपी हटवणे अत्यंत आव्हानात्मक काम होते, ज्यासाठी मोठा कालावधी लागला आणि २०१८ ते २०१९ दरम्यान प्रत्यक्ष कामापैकी दगड उतरवणे, नवीन दगड घडवणे, ते रचने, लावण्या सुरुवात करणे अशी काही कामे करण्यात आली. परंतु, २०२० मध्ये पुन्हा कोविड संकटाने पाय पसरले आणि मंदिराच्या कामात विघ्न आले.

मुख्य म्हणजे, या मंदिराच्या कामासाठी पुरातन मंदिर घडवण्याचा चांगला अनुभव असलेल्या कारागिरांना थेट तामिळनाडूतून आणले गेले होते. ज्यांना कोविडमध्ये पुन्हा आपल्या राज्यात परतावे लागले. परिणामी, दोन वर्षे मंदिराचे काम पूर्णत: बंद ठेवावे लागले. अशा स्थितीत आता २०२२ मध्ये पुन्हा कामाला सुरुवात झाली आणि आजतागायत बहुतांश काम पूर्ण होत असल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत मंदिराचे दक्षिणेकडील काम पूर्णत्वाकडे आले असून, उत्तरेकडील काम २५ टक्के पूर्ण झाले आहे. दरम्यान, शिखराचेही काम पूर्ण होत असून, डिसेंबरअखेरपर्यंत मंदिराचे काम पूर्ण होऊ शकते, अशी अपेक्षा पुरातत्व विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

अडचणींचा विसर पडला कसा 

कुठलेही काम करताना त्यात येणार्‍या अडचणींचा विचार केला जाणे गरजेचे असते. परंतु, सुंदर नारायण मंदिराच्या उभारणीत कुठलाही विचार केला गेला नसावा, असेच चित्र आजवर दिसून आले आहे. कोरोना संकट नैसर्गिक होते. मात्र, मंदिराशेजारील विद्युत डीपीचे जाळे, एका बाजूकडील गादी कारखान्याची अडचण, त्यामुळे क्रेन उभी करण्यास जागा नसल्याने आलेल्या अडचणी, मध्यंतरी कोर्टात गेलेले प्रकरण, अतिक्रमण, वाहतुकीचा प्रश्न बारकाईने-कुशलतेने चुन्यात करावे लागणारे काम अशा एक ना अनेक गोष्टींमुळे मंदिराच्या उभारणीत वेळ गेला. ज्याचा विचारच केला गेला नव्हता. यामुळे प्रशासकीय स्तरावर घालून दिलेल्या कालमर्यादेपेक्षा अधिकचा वेळ लागला, असा दावा पुरातत्व विभागाने केला आहे. त्यामुळे या अडचणींचा कामापूर्वीच विचार केला जाणे गरजेचे होते.

 

शासनाने घालून दिलेली कालमर्यादा वस्तूस्थितीला धरून नव्हती. कारण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर त्यात येणार्‍या अडथळ्यांचाही विचार केला जावा. प्रत्यक्षात तसे झाले नाही. सातत्याने अडचणी येत गेल्या. यामुळे कामास विलंब झाला. डिसेंबरपर्यंत काम पूर्णत्वास येईल : आरती आळे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग