मविप्रचा वटवृक्ष बहरण्यासाठी ‘प्रगती’ला साथ द्या : शेटे

नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळात सगळ्या शिक्षणसंस्था काही ठराविक समाजाच्या अधिपत्याखाली काम करत होत्या. दर्‍याखोर्‍यांत, ग्रामीण भागात राहणारा जो वर्ग आहे तो शिक्षणापासून वंचित होता. अशा काळात कर्मवीरांनी प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन ही समाजाची संस्था उभी केली. आज त्या समाजाच्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. हा वटवृक्ष बहरण्यासाठी नीलिमा पवार व प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले.

कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांंनी संस्थेची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय आपण या स्पर्धेच्या काळात आपली शिक्षण व्यवस्था टिकू शकणार नाही, हे ओळखून मेडिकल कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, नर्सिंग कॉलेजसारखे प्रोफेशनल युनिट आणून संस्था टिकवून ठेवण्यासाठी संस्थेचा आर्थिक स्तर उंचावला. स्पर्धेच्या युगात इतर संस्थेच्या बरोबरीची बांधकामे, सुखसुविधा, शालेय वातावरण निर्मितीचे काम नीलिमा पवार व मविप्रच्या संचालक मंडळाने केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य संस्था व समाजाची संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. संस्थेच्या प्रगतीचे व विकासाचे धोरण कार्यकारी मंडळाने राबविले असून कोरोना काळात संपूर्ण जिल्ह्यात आरोग्यसेवा पुरवत समाजासमोर आदर्श उभा केला आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीसाठी नीलिमा पवार व प्रगती पॅनलच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ताकदीने उभे राहावे, असे आवाहनही शेटे यांनी केले.