नाशिक : सलग चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर वरुणराजाने विश्रांती घेतली असून सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने शेतीकामास वेग आला आहे. सलग चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर तालुक्यातील पाच धरणांत समाधानकारक जलसाठा संकलित झाला आहे. तर वरुणराजाच्या कृपावृष्टीनंतर आता सूर्यनारायणाने दर्शन दिले आहे. त्यात खोळंबलेल्या शेतीकामास गति देण्यासाठी शेतकरी वर्गाने अग्रक्रम दिला आहे.
दिंडोरी तालुक्यात द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यामुळे नगदी पीक असा परिचय असलेल्या द्राक्ष लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी शेती व्यवसायाला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. कामेही खोळंबली होती. त्यात द्राक्षबागांच्या छाटण्या खोळंबल्या होत्या. आता मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर विश्रांती घेतल्याने द्राक्ष बागांच्या छाटण्यांना वेग आलेला आहे.
सोयाबिन पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला होता. मात्र आता पावसानंतर रोग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यास उत्पादक सरसावले आहेत. टोमॅटो पीक घेण्यासाठी फाऊंडेशनच्या कामांना वेग आलेला आहे. कारण या वेळेस विक्रमी लागवड होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. पावसामुळे या पिकासाठी अनुकुलता मानण्यात येत असली तरी रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी अनुकूल वातावरण फवारणीसाठी निर्माण झाले आहे. त्यामुळे विविध स्वरुपाच्या शेतीकामाना वेग आलेला आहे.
दिंडोरी तालुक्यातील धरणाचा पाणीसाठा
- करंजवण : 89%
- पालखेड : 97%
- पुणेगाव : 94%
- वाघाड : 100%
- ओझरखेड : 87%
- तिसगाव : 30%
गोदामाईही स्थिरावली
दोन दिवस नाशिक शहरासह सर्वदूर झालेल्या पावसाने सर्वांना मोठा दिलासा मिळाला. शुक्रवारी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे जोरदार पाऊस झाला. शनिवारी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ होता. यामुळे शहरासह जिल्ह्यातही फारसा जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी शुक्रवारी वेगाने विविध धरणांमधून वाढविलेला विसर्ग शनिवारी सकाळपासून तितक्याच वेगाने पाटबंधारे खात्याकडून कमी करण्यात आला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होताच गोदावरीची पूरस्थितीही हटली. एकूणच गोदावरीचा पूर रात्रीपर्यंत पूर्णतः ओसरला होता. शनिवारी दुपारनंतर गोदाकाठावरील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था झाली. भुयारी गटारींचे चेंबरही ठिकठिकाणी तुडुंब भरुन वाहत होते. शनिवारीही काही भागात चेंबरमधून पाणी ओथंबून वाहताना नजरेस पडले.