घरताज्या घडामोडीसुशांत सिंह प्रकरण : बिहार पोलिसांची अडवणूक नको

सुशांत सिंह प्रकरण : बिहार पोलिसांची अडवणूक नको

Subscribe

महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टिका

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत असतानाच आता, या प्रकरणाच्या तपासावरून राजकारण सुरू झाले आहे. बिहारच्या आयपीएस अधिकार्‍याला होम क्वारंटाईन केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. याप्रकरणी बिहार पोलिसांना निरपेक्षपणे तपास करू द्यावा. मुंबई पोलीस चांगले काम करत आहेत, मात्र कधीकधी राजकीय दबावामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर भूमिकेवर टिका केली.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सोमवारी (दि.३०) नाशिकला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरंटाईन केले. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. याविरोधात भाजपने आंदोलनही केले. याबाबत फडणवीस म्हणाले, मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. याच पोलिसांसोबत मी काम केले आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस चांगले काम करत आहेत. मात्र, कधीकधी राजकीय दबावामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. बिहार पोलिसांना क्वॉरंटाईन का केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बिहार पोलिसांना जो तपास करायचा तो करू द्यावा. तपास मुंबई पोलिसांनी करावा कि, बिहार पोलिसांनी याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल. महाराष्ट्र सरकारवर यामुळे संशय निर्माण होत आहे. तो सरकारने दूर करावा, असे सांगत सरकारच्या सध्याच्या भूमिकेमुळे जनतेच्या भावनांचा अनादर होत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर तोशेरे ओढले..

राममंदिर मुद्द्यावरून विवाद टाळावा

अयोध्येत होणार्‍या राममंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण कुणालाच नाही. कार सेवकांच्या वेळी उपस्थित असल्याने मला जाता आले असते तर आनंद झाला असता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आहे की नाही याची आपल्याला कल्पना नसल्याचेही ते म्हणाले. आम्हाला बोलावले नसले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वांचे प्रतिनिधी म्हणून भूमिपूजन करणार आहेत. अयोध्येत राममंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. कोरोना काळात राममंदिराच्या मुद्द्यावरुन मतभेद न होऊ देता राज्य सरकारने यावर समन्वय काढण्याची अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

त्या ट्विटचा चुकीचा अर्थ
फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह मृत्यूच्या तपासावरुन टीका केली. मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, अमृता यांनी केलेले व्टिट हे सुशांत सिंग राजपूत यांच्या विषयावर आहे. त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो आहे. मुंबई सुरक्षित आहे. कृपया याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. या प्रकरणात जनतेला उत्तर हवे आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -