पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बापाने अडीच वर्षीय चिमूकल्याला फेकले विहिरीत, बाळाचा बुडूब मृत्यू

नाशिक : पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयातून रागाच्या भरात जन्मदात्यानेच अडीच वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत टाकून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगीमध्ये बुधवारी (दि.१७) घडली. याप्रकरणी पत्नीने दिंडोरी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीला अटक केली आहे.घनशाम राजेंद्र अपसुंदे (वय दोन वर्ष सहा महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. राजेंद्र छबू अपसुंदे (वय 43, रा. कादवा म्हाळुंगी, ता. दिंडोरी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितेनेउसार, वर्षा अपसुंदे (वय 28) हिचे राजेंद्रशी विवाह झाला. राजेंद्र नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्याने रागाच्या भरात दाम्पत्याचा मुलगा घनशामला निवृत्ती देवराम निकम यांच्या विहिरीत टाकून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राजेंद्र अपसुंदे यास अटक केली. पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जेजोट करत आहेत.