संशयास्पद मृत्यू आणि परस्पर पुरून टाकला मृतदेह

आज पोलीस, तहसीलदार अन् सिव्हिलमधील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बाहेर काढणार मृतदेह; नातेवाईकांकडून घातपाताचा आरोप

नाशिक : एका मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार न करता त्याचा मृतदेह पुरून टाकल्याची धक्कादायक बाब सोमवारी (दि.8) पंचवटीतील निलगिरी बाग परिसरात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हिरामण आहेर (वय 45) असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते ज्या महिलेसोबत रहात होते, त्यांनीच हा प्रकार केल्याचा आरोप केला जातोय. याशिवाय हा मृत्यू नसून घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप मृताच्या नातलगांकडून केला जातोय. याप्रकरणी अद्याप आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र मंगळवारी (दि.९) सकाळी तहसीलदार, सिव्हिलमधील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा मृतदेह बाहेर काढण्यात येणार असून, त्यादृष्टीने पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलगिरी बाग झोपडपट्टी येथे हिरामण अहिरे हे एका महिलेसोबत दहा ते पंधरा वर्षांपासून वास्तव्यास होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पायाला गँगरीन झाले होते. त्यामुळे त्यांच्या जखमांमुळे त्यांना घरातच रहावे लागत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत राहणारी महिला आणि तिचा भाऊ हे मजुरीसाठी बाहेर पडले. तेव्हा आहिरेदेखील त्यांच्या मागे गेले. मात्र गँगरीनमुळे त्यांना चालता आले नाही. अखेर ते निलगिरी बाग परिसरात एका मोकळ्या जागेवर पडले.

यानंतर दोन दिवस ते घरी आले नाही. ओळखीतील कामगारांनी निलगिरी बागेतील मोकळ्या जागेत आहिरे पडून असल्याचे संबंधित महिलेला सांगितले. तेव्हा महिला आणि तिच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता हा व्यक्ती मृतअवस्थेत पडल्याचे दिसून आले. अशावेळी त्यांच्यावर योग्यरित्या अंत्यसंस्कार करणे अपेक्षित असताना या महिलेसह नातेवाईकांनी आहिरे यांना त्याच ठिकाणी खड्डा खोदून पुरून टाकले.

कचरावेचक महिलांनी मृत व्यक्तीच्या घंटागाडी कामगार असलेला नातेवाईकांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यांच्याकडून ही बातमी मृताच्या मूळ गावी म्हणजेच नांदगाव येथील नातेवाईकांना मिळाली. तेव्हा नातेवाईकांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून हा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. त्यानुसार, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून मंगळवारी सकाळी तहसीलदार आणि सिव्हिलमधील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत हा मृतदेह काढण्यात येणार आहे. त्यावरून अहवाल मागवून पुढील कारवाई केली जाणार आहे. पाथरे हे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

शवविच्छेदन अहवालातून उलगडा

पोलिसांकडून तहसीलदार तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकार्‍यांना जागेवर शवविच्छेदन करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.९) सकाळी मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. या व्यक्तीच्या शवविच्छेदनातून सर्व संशयास्पद बाबींचा उलगडा होणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकार्‍यांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येणार आहे. हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात, याचा उलगडा झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानुसार पुढील कारवाई करू. : इरफान शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगाव