घरमहाराष्ट्रनाशिकवर्तन चारित्र्यसंपन्न असावे, जीवनाचे निर्माल्य देशासाठी व्हावे : प्रकाश पाठक

वर्तन चारित्र्यसंपन्न असावे, जीवनाचे निर्माल्य देशासाठी व्हावे : प्रकाश पाठक

Subscribe

विवेकानंद केंद्राच्या वतीने समर्थ भारत पर्व उत्सव कार्यक्रम

आपले वर्तन चारित्र्यसंपन्न असावे, जेणेकरुन आपला समाज आणि राष्ट्राचेही हित साधले पाहिजे. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार समजून घेऊन कृतीत आणावेत आणि जीवनाचे निर्माल्य देशासाठी सत्कारणी लावावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा विवेकानंद केंद्राचे प्रांत सहसंचालक प्रकाश पाठक यांनी केले.

विवेकानंद केंद्र, नाशिक शाखेच्या वतीने समर्थ भारत पर्व या कार्यक्रमांतर्गत विवेकानंदाच्या १५६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पाठक बोलत होते. नाशिकरोड येथील अंबा सोसायटीच्या समाजमंदिरात झालेल्या या व्याख्यानात विवेकानंदाचे विचारपुष्प (कौटुंबिक, मानसिक, आध्यात्मिक व सामाजिक प्रगतीसाठी) या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. पाठक पुढे म्हणाले, महापुरुषांचे जीवन कथनासाठी नव्हे तर अनुकरणासाठी असते, आपल्या भारताचे मूळ चारित्र्य असले तरी आजची परिस्थिती अत्यंत खेदजनक आहे. चारित्र्य ही संकल्पना केवळ स्त्री संबंधापुरता मर्यादित नाही. तर, चारित्र्य हे सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय पातळीवरील विशुद्ध व्यवहारांशी संबंधित असते. म्हणूनच चारित्र्यसंपन्नतेच्या मूल्यांची जोपासना करणे हे भारताचे बलस्थान आहे, ही बाब तरुणांनी समजून घेतली पाहिजे. विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांतून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणा आणि आपले जीवन एक साधना बनू द्या, असे आवाहनही त्यांनी उपस्थित तरुणांना केले.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा नाशिक केंद्राचे सहसंचालक विश्वास देवकर होते. गतिमान अध्यात्मिक उन्नयन हाच विवेकानंद केंद्राच्या कार्याचा पाया आहे. त्यानुसार मनुष्यनिर्माण, चारित्र्यसंपन्नता व राष्ट्र पुनरुत्थानासाठी विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते कृती करत आहेत, असे देवकर यांनी सांगितले. तत्पूर्वी तीन ओमकार व शांतीपाठाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रकल्प प्रमुख जयंत दीक्षित, यतिन मुजुमदार, नगर प्रमुख प्रा. अमोल अहिरे आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक अनंत वाघ यांनी केले, केंद्रपरिचय नितीन साठे यांनी करुन दिला. पाहुण्यांचा परिचय उमेश झोटिंग यांनी केला. यावेळी केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी राजेंद्र पवार यांनी गीत सादर केले. सूत्रसंचालन तुषार डोके यांनी केले. प्रा. अमोल अहिरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी यतिन मुजुमदार, राजेंद्र पवार, प्रा. अमोल अहिरे, प्रमोद वाघ, अंकुश आहेर, जय ठाकरे, चेतन पवार, जितेंद्र वराडे आदी प्रयत्नशील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -