ग्रंथदिंडीत दिसेल सावरकर सम्रग साहित्य चित्ररथ

नवरंगाच्या माध्यमाद्वारे विविध शाळांमधील विद्यार्थी, नागरिकांना ग्रंथदिंडीत केले जाणार सहभागी

sahitya sammelan

नाशिक : साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ग्रंथसंपदेचा समावेश असलेला चित्ररथ भगूरहून सहभागी होणार आहे. शिवाय, इस्पॅलियर स्कूलचे विद्यार्थी ग्रंथदिंडीत विज्ञानाधारीत चित्ररथ सादर करणार आहेत.

ग्रंथदिंडी तयारी आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.१६) संमेलन कार्यालयात ग्रंथदिंडी समिती प्रमुख व सदस्यांची बैठक झाली. यावेळी तयारीचा आढावा घेण्यात आला. ग्रंथदिंडीस ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग असावा, यासाठी नऊ विभागांत समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. नवरंगाच्या माध्यमाद्वारे विविध भागांतील शाळांमधील विद्यार्थी, नागरिकांना ग्रंथदिंडीत सहभागी केले जाणार आहे.

ग्रंथदिंडीतील विभागनिहाय रंग पुढीलप्रमाणे :

  • मुख्य दिंडी-पिवळा
  • जुने नाशिक -तपकिरी
  • सातपूर-भगवा
  • भगूर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड-गुलाबी
  • इंदिरानगर- लाल
  • सिडको-जांभळा
  • म्हसरुळ, पंचवटी-चिंतामणी
  • मखमलाबाद- हिरवा
  • गंगापूर गाव, गंगापूर रोड – आकाशी.

संमेलनात सहभागी शिक्षकांना मिळणार सुटी

संमेलनाच्या विविध समित्यांमध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षकांना संमेलन कालावधीत कर्तव्य रजा देण्याचा निर्णय विभागीय उपशिक्षण संचालक नितीन उपासनी यांनी घेतला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत ही मागणी केली होती. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच, सर्व शाळेतील विद्यार्थी किंवा शिक्षकांना संमेलनास भेट द्यायची असेल तर त्यांनी शनिवारी किंवा रविवार या दोन दिवसांमध्ये भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

कालिदास कलामंदिरातील साहित्य संमेलन कार्यालयात बुधवारी (दि.१७) सायंकाळी ६ वाजता उद्घाटन व समारोप समितीची आढावा बैठक झाली. याप्रसंगी समितीप्रमुख प्रा. वंदना रकिबे, वैभव देशमुख, विलास सूर्यवंशी, सोमनाथ भिसे, अविनाश शिरसाठ, स्नेहल पवार, संदीप जाधव आदी उपस्थित होते.