बंडखोर नेते एकनाथ शिंदे, दादा भुसे, सुहास कांदे यांची नाशकात प्रतिकात्मक अंत्ययात्रा

शिवसेनेचा इशारा, गद्दारांना नाही थारा

नाशिक : ‘लाल लाल पागोटं गुलाबी शेला, एकनाथ शिंदे मेला, त्याच्या मयताला चला’, ‘गद्दारांना नाही थारा, शिवसेनेचा एकच इशारा’, ‘हमसे जो टकरायेगा मिट्टी में मिल जायेगा’… अशा निषेधाच्या तीव्र शब्दांत घोषणा देत नाशिकच्या हजारो शिवसैनिकांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. रविवारी (दि.26) शिवसेनेच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयापासून निघालेल्या या अंत्ययात्रेत प्रतिकात्मक तिरडीही बांधण्यात आली. त्यावर एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि सुहास कांदे यांचे फोटो लावण्यात आले.

भगवा झेंडा, हातात निषेधाचे फलक आणि तिरडी खांद्यावर घेवून शालिमार येथून निघालेले हजारो शिवसैनिक शहरातील गाडगे महाराज पुतळा, साक्षी गणेश मंदीरामार्गे रोकडोबा तालीमपासून सरळ नाशिक अमरधाममध्ये पोहोचले. तेथे संतप्त शिवसैनिकांनी प्रतिकात्मक तिरडीचे दहन केले. यावेळी महिला शिवसैनिकांनी शिंदे, भुसे आणि कांदेंच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलनही केले. नाशिक अमरधामच्या प्रवेशद्वारावरच शोकसभा घेवून या बंडखोर आमदारांना प्रतिकात्मक श्रध्दांजलीही वाहिली. यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे यांनी शोकभावना व्यक्त केली. ज्या शिवसेनेने यांना आमदार केले, मंत्रीपद दिले त्यांनीच पक्षासोबत गद्दारी केली. त्यांच्या निषेधार्थ ही अंत्ययात्रा होती. यापुढे या गद्दारांना नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

अंत्ययात्रेत उपनेते बबन घोलप, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, महिला आघाडीच्या शोभा मगर, माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, सचिन मराठे, अमोल जाधव, डी. जी. सूर्यवंशी, माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, हर्षा बडगुजर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे, युवा सेनेचे जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, सुनील जाधव यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रतिकात्मक अंत्ययात्रेस कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिंदेंचा निषेध ठाकरेंना बळ

नाशिकच्या शिवसैनिकांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह नाशिकच्या दोन आमदारांचा तीव्र शब्दांत निषेध तर नोंदवला. शिवाय मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठबळ देवून त्यांचे मनोबलही वाढवले. अंत्ययात्रेत सहभागी झालेले हजारो शिवसैनिकांमुळे जुन्या नाशिक परिसराला एक वेगळेच स्वरुप प्राप्त झाले होते. निषेधाच्या घोषणा असतील किंवा रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिलांचा आक्रोश…यामुळे शिवसैनिकांच्या भावना अधिक तीव्र असल्याचे दिसून आले.

स्थानिक नेते काय म्हणतात ..?

ज्या शिवसैनिकांनी जीवाचे रान करुन यांना आमदार, खासदार, मंत्री केले ते गद्दार पाच दिवसांपासून शिवसेनेच्या बाहेर गेले आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बंडखोरांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.
-सुनील बागूल, उपनेते, शिवसेना

नेत्यांच्या कानात बोलणारे नेहमी गद्दार असतात. त्यामुळे अशा लोकांची जवळीक नको. दादा भुसे, सुहास कांदे यांच्या मदतीची शिवसेनेला गरज असताना हे पळून गेले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना बघवले गेले नाही म्हणून ही बंडखोरी केली. आमदारांचे हे कृत्य निषेधार्य आहे.
– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख

पानाला चुना लावणारा, ढकलगाडी लोटणारा तर कुणी रिक्षा चालवणारा… अशा तीनपाट लोकांना शिवसेनेने आमदार, खासदार, मंत्री केले. तरी त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. ही गद्दारी आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्ही परत या आम्ही तुमच्या छातडावर बसून शिवसेनेचा भगवा गाडल्याशिवाय राहणार नाही. – विजय करंजकर, जिल्हाप्रमुख

शिवसैनिकांच्या दृष्टीने हा अत्यंत दुःखाचा दिवस आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाशिक जिल्ह्यावर खूप प्रेम राहिले आहे. दादा भुसे यांना दोन्ही वेळा कॅबिनेट मंत्रिपद दिले. असे असताना नाशिकचे दोन्ही आमदार गद्दारांसोबत निघून गेले. त्यांच्या निषेधार्थ ही अंत्ययात्रा काढण्यात आली.
– दत्ता गायकवाड, माजी जिल्हाप्रमुख

शिवसेना पक्षासोबत ज्यांनी आजपर्यंत गद्दारी केली आहे, त्यांना शिवसेनेने नेहमी धडा शिकवला. आता पक्षनिष्ठा दाखवण्याची वेळ असताना आमदार, मंत्री हे उद्धव साहेबांना सोडून जात आहेत. पण त्याने शिवसेनेला काहीच फरक पडत नाही. शिवसेना ही नेहमी निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावर चालते.
– विनायक पांडे, माजी महापौर

गद्दारांना निर्वाणीचा इशारा देण्यासाठी ही अंत्ययात्रा काढण्यात आली. आगामी काळात शिवसेना त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. अनेकांनी यापूर्वी बंडखोरी केली. पण त्याचा शिवसेना पक्षावर कुठलाही परिणाम झाला नाही. असे अनेक शिवसैनिक निर्माण होतील. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहील.
– खासदार हेमंत गोडसे, नाशिक

पक्ष सोडून गेलेले सर्व गद्दार आहेत. त्यांच्या निषेधार्थ आम्ही हा बोंबाबोंब मोर्चा काढला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या सर्वांचे राजकीय भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यांना निष्ठावान शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
– हर्षा बडगुजर, माजी नगरसेविका

राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नावाखाली गद्दार आमदार सोडून गेले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्याक घटकांसाठी खूप चांगले काम केले. जे गद्दार आहेत त्यांना भगवान शिक्षा देईलच, पण एक गद्दार सोडून गेला तरी शंभर निष्ठावान तयार होतील.
– निलोफर शेख, महिला आघाडी

रागात मनुष्य जातो, पण एक-दोन दिवसांत ते परत येतील, अशी अपेक्षा होती. परंतु, बंडखोर नेत्यांनी प्रतीशिवसेना स्थापण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की, आमदारांची संख्या मर्यादित आहे. शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात असल्यामुळे या बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल. शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है..
– शोभा मगर, शिवसेना महिला आघाडी

शिवसेनेत जेव्हाही बंडखोरी झाली तेव्हा शिवसेना जोमाने उभी राहिली आहे. 56 आमदार गेले तरी 156 आमदार निवडून आणण्याची ताकद या शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे शिवसेना ही नेत्यांवर नाही तर शिवसैनिकांच्या पाठिंब्यावर जिवंत आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक सदैव तयार असतात.  – वैभव ठाकरे, जिल्हाप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना