तलाठी संपावर, सात बारा उतारे बंद

नैसर्गिक आपत्ती आणि निवडणूक काम वगळता सगळी महसूली कामे ठप्प

Sat Bara

जिल्ह्यात दोन दिवसांपासून तलाठ्यांच्या कामांवरील बहिष्कारामुळे सात-बारे उतारे मिळणे बंद झाले आहे. गावोगावचे महसूल कामकाजांचा महत्वाचा दुवा असलेला तलाठी तात्या संपावर असल्याने नैसर्गिक आपत्ती आणि निवडणूक काम वगळता सगळी महसूली कामे ठप्प झाली आहेत.

महसूल यंत्रणेतील तलाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. गावोगावच्या गावनोंदीपासून तर सात-बारा उतार्‍यापासून इतरही महत्त्वाच्या कामांसाठी तलाठी घटक कार्यरत असतो. गेल्या आठवड्यापासून राज्यात तलाठी आणि मंडलाधिकारी आंदोलनावर आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून मंगळवार (दि. १२) पासून तलाठ्यांनी त्यांच्याकडील डीसी तहसिल कार्यालयात जमा करुन कामावर बहिष्कार घातला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीची कामे वगळता इतर सर्व कामांवर राज्यातील तलाठ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील गावगाड्याचे कामकाज ठप्प झाले आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्तालयातील समन्वयक रामदास जगताप यांना निलंबित करावे, अशी तलाठी संघाची मागणी आहे.

मेसेजमुळे आंदोलन

राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी टाकलेल्या मेसेजला प्रत्युतरादरम्यान तलाठ्यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर समन्वयक जगताप यांनी अपमानास्पद शब्द वापरल्याने हे आंदोलन पेटले आहे.