बालवयातच स्पर्धा परीक्षेचे बाळकडू

‘तारुखेडले टॅलेंट सर्च’ नावाने तारुखेडले गावाचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

माझी शाळा, माझा उपक्रम याअंतर्गत प्राथमिक विद्यामंदिर तारुखेडले शाळेतील विद्यार्थ्यांची पायाभरणी व्हावी, या हेतूने शाळेत स्पर्धा परीक्षेचे बाळकडू बालवयातच मिळत आहे. यासाठी शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध अशा परीक्षांची पूर्वतयारी म्हणून ‘तारुखेडले टॅलेंट सर्च’ या नावाने या शैक्षणिक वर्षात तीन गुणवंत विद्यार्थी शोधून त्यांना वर्षे अखेरीस प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करणार आहे.

तिसरी, चौथी व पाचवीच्या मुलांना घेऊन दररोज सकाळी त्यांना मार्गदर्शन केले जाते. यासाठी भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी विषयावर प्रत्येकी ५ गुण, अशा एकूण २० गुणांची प्रश्नपत्रिका शिक्षक तयार करतात. परिक्षेत प्रथम येणार्‍या विद्यार्थ्याचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सन्मान केला जातो.अशाप्रकारे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जे तीन विद्यार्थी सर्वात जास्तवेळा विजेते होईल त्यांना समारंभपूर्वक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. यामुळे मुलांना मुलाखत द्यायला आत्मविश्वास वाढतो. उपक्रम घेण्यासाठी केंद्रप्रमुख वाघ यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. उपसरपंच नितीन जगताप, शाळा समिती अध्यक्ष अनिल जगताप यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. शिक्षक मच्छिंद्र जगताप, मदन बिरादार, अनिल पवार, संदीप गायकवाड, गोराडे स्पर्धा परीक्षेचे धडे देत आहे.

विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, बौद्धिक,आकलन क्षमता व तर्कसंगत दृष्टिकोन वाढीस लागेल. – शिंदे, मुख्याध्यापक

ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याच क्षेत्रात मागे राहणार नाही

स्पर्धा परीक्षांची रंगीत तालीम बालवयापासून करुन घेतली तर भविष्यात ग्रामीण भागातील मुलही मागे राहणार नाहीत.
– मच्छिंद्र जगताप, शिक्षक.