घरमहाराष्ट्रनाशिकगोदावरीत पोहण्याचा प्रत्येकाला धडा

गोदावरीत पोहण्याचा प्रत्येकाला धडा

Subscribe

नाशिकला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर इतिहास आहे. नाशिक अर्थात गुलशनाबाद शहराच्या इतिहासाचा हा वैभवशाली खजिना नाशिक जिल्हा न्यायालयाचे निवृत्त सहायक अधीक्षक श्रीराम शिंगणे यांच्या लेखांमधून प्रसिद्ध करत आहोत. शहराच्या चौकांतील धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नाशिकला वैभवाप्रत नेण्यासाठी या चौकातील काही मान्यवरांची माहितीही या मालिकेतून प्रसिद्ध करत आहोत…

मुलगा पाच वर्षांचा झाला की त्याला शाळेत पाठवणे आवश्यक समजले जाते. तसेच, जो नदीकिनारी राहतो त्याला पोहता आलेच पाहिजे, असा एक अलिखित नियमच नाशिक शहरात बनला होता. साधारण शालेय जीवनातच मुले पोहायला शिकत. गल्लीतील कोणीतरी जाणकार मोठा मुलगा त्यांना घेऊन जात असे व पोहायला शिकवत. असे हे पोहण्याचे वेड इतके असे की सकाळ, संध्याकाळ पोहोल्याशिवाय कित्येक तरुणांना चैन पडत नसे.

- Advertisement -

गांधी तलावावर चक्रीपर्यंत पोहायला खूप मजा वाटायची. गुपचुप चोरून पोहायला जाताना दोघांपैकी कोणीतरी टॉवेल खिडकीतून फेकायचा तो दुसर्‍याने झेलायचा. या एका टॉवेलवर कोरडी अंडरपॅण्ट घेऊन पोहायला जायचे. येथेच्छ पोहणे झाले की टॉवेल दोघांनी वापरायचा. तो ओला टॉवेल अंगावर पांघरून घरी येईपर्यंत वाळवायचा असा दिनक्रम असे. पुढे चांगले पोहायला यायला लागल्यावर घारपुरे घाटावर म्हणजे व्हिक्टोरिया पुलापलीकडे मुले पोहोण्याचा आनंद घेत असत. तसेच, व्हिक्टोरिया पुलावरुन उडी मारणे हा अनेक तरुण व किशोरवयीन मुलांचा छंद होता. उडी मारताना जी गर्दी जमत असे त्याला तोड नसे. उडी मारुन परत उडी मारण्यासाठी पायर्‍या चढून परत व्हिक्टोरिया पुलावर जाताना एखाद्या व्हीआयपीला जागा करून द्यावी. त्याप्रमाणे गर्दी त्या उडी मारणार्‍याला वाट करून देत असे व कौतुकाने न्याहाळत असे.

व्हिक्टोरिया पुलासमोरील चक्रीवरुन धप्पादेखील अनेक तरुण व किशोरवयीन मुले मारत असत. धप्पा हा प्रकार त्या काळात फारच प्रचलित झाला होता. अनेकवेळा अनेकांचे पोहत असताना कपडेदेखील चोरटे पळवत असत. मुलांच्या प्रत्येक टोळक्यात एखादा आडदांड मुलगा असे. तो नेहमी एखाद्या मुलास बुडवत असे. म्हणजे पाणी पाजणे असे त्यावेळी म्हणत. असाच एक तरुण तांबट आळीत राहणारा शशिकांत शेटे. हा पट्टीचा पोहणारा. त्याने अनेकांना बुडताना वाचवले होते. हा प्रत्येक महापुरात उडी मारत असे. महापुरात पोहणे हा याचा आवडीचा छंद होता. मात्र एकदा असाच महापूर आला असता त्याने रामसेतु पुलावरून उडी मारली तो थेट गाडगे महाराज पुलापुढे दिसला. तेथून पुढे असलेल्या रोकडोबा मारुतीपाशी त्याने हात दाखवला. सर्वांना वाटले हा पाण्याची खोली किती आहे ते दाखवतो आहे पण तो हात दाखवत नव्हता तर बुडत होता. कोणालाच काही कळले नाही. तो परत दिसलाच नाही. खूप वेळ होऊन गेल्यावरदेखील तो न दिसल्याने धावपळ सुरू झाली. तात्काळ धरणाचे पाणी सोडणे थांबवण्यात आले तरीही तो सापडला नाही. तीन दिवस त्याचा शोध सुरू होता. अखेर सायखेड्याजवळील बंधार्‍यात तो मृतावस्थेत आढळून आला. दुसरा तरुण प्रकाश भडकमकर हादेखील पट्टीचा पोहणारा. पण त्याचादेखील पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण खूप धाडसी होते. त्यांनी गोदेत बुडणार्‍यांचे प्राण वाचवले होते. त्यामुळे अशा उमद्या तरुणांचा शेवट त्याच गोदामाईच्या कुशीत व्हावा, ही नाशिककरांसाठी अत्यंत क्लेशकारक घटना होती!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -