दोन लाखांची लाच घेणार्‍या तहसीलदाराच्या वाहनचालकास अटक

नाशिक : शेतजमिनीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून दिल्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची लाच स्विकारणार्‍यास शासकीय वाहनचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने शनिवारी (दि.४) अटक केली. अनिल बाबूराव आगिवले (वय 44) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.

अनिल आगिवले यांची तहसील कार्यालय त्रंबकेश्वर, संलग्न उपविभागीय कार्यालय इगतपुरी त्र्यंबकेश्वर येथे शासकीय वाहनचालक म्हणून नेमणूक आहे. वाडीवर्‍हे येथील तक्रारदारांनी शिरसाठे (ता. इगतपुरी) येथे गट नंबर 176 मधील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसार पावती नोटरी केली होती. या शेतजमिनीसंदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी, इगतपुरी त्र्यंबकेश्वर येथे वाद चालू होता. या वादाचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात आगिवले यांनी तक्रारदाराकडून 24 फेब्रुवारी रोजी दोन लाख रुपये लाचेची मागणी करून 50 हजार रुपये पूर्वी घेतल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे उर्वरीत दीड लाख रुपये आगिवले यांनी शनिवारी (दि.४) तक्रारदाराकडून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

लाचेची मागणी केल्यास साधा संपर्क

नागरिकांना कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकने केले आहे.