टीईटीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना एसटी बंदमुळे मनस्ताप

परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यात विलंब, संतप्त विद्यार्थी-केंद्र संचालकांत वाद

TET exams

नाशिक : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) निघालेल्या विद्यार्थ्यांना एसटी बंदमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास १५ ते २० मिनिटांचा विलंब झाला. त्यामुळे काहींना परीक्षेसाठी वेळ कमी पडला तर काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला नाही. परिणामी विद्यार्थी व केंद्र संचालकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

नाशिकसह राज्यभरातील विविध केंद्रांवर रविवारी (दि.२१) शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी ग्रामीण भागासह परजिल्ह्यातील उमेदवारांना शहरातील केंद्र परीक्षेसाठी मिळाले होते. मात्र, बसेस बंद असल्याने अनेकांना उमेदवारांना १० ते १५ मिनिटे उशीर झाला. पेपर एकसाठी सकाळी साडेदहाची वेळ होती.उमेदवारांना २० मिनिटांपूर्वी अर्थात १० वाजून १० मिनिटांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. मात्र, काहींना विलंब झाला. त्यामुळे या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. त्यातील अनेक उमेदवारांनी केंद्र संचालकांना विनंती केली. मात्र, तरीही त्यांना प्रवेश मिळाला नाही. तर काही परीक्षा केंद्रांवर प्रवेश दिला न गेल्याने संतप्त झालेल्या उमेदवारांनी केंद्र संचालकांशी वाद घातल्याने गोंधळही उडाला.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील ४३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परिषदेकडून उमेदवारांना परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी २० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रात दाखल व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, एसटी बसेसचा संप सुरु असल्याने अनेक परीक्षार्थींना केंद्रावर वेळेत पोहोचता आले नाही. शहराबाहेरील तसेच परजिल्ह्यांतील उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यातील काही महिला परीक्षार्थी उमेदवार तसेच काही परजिल्ह्यांतून आलेले इतरही उमेदवारांना आपल्या परीक्षा केंद्रावर दाखल होण्यास काहीसा उशीर झाला. परंतु, उशीर झाल्याचे कारण देत त्यांना केंद्रात प्रवेश दिला गेला नाही. अनेक परीक्षार्थींनी केंद्र संचालकांकडे विनंती करूनही त्यांना परीक्षेला प्रविष्ठ होण्यापासून रोखण्यात आले. शहरातील सहा ते सात केंद्रांवर अशा प्रकारे परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याने त्यांना टीईटी परीक्षा देता आली नाही.

साडेतीन हजारांहून अधिक उमेदवारांची अनुपस्थिती

प्राथमिक शिक्षणस्तर (पेपर एक) हा इयत्ता पहिली ते पाचवी तर व उच्च प्राथमिक शिक्षणस्तर (पेपर दोन) इयत्ता सहावी ते आठवीच्या अध्यापनासाठी परीक्षा घेण्यात आली. पेपर एकसाठी शहरातील ४३ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. पेपर एकला १५ हजार १४४ उमेदवारांपैकी १३ हजार १६ परीक्षार्थी हजर होते. तर २ हजार १२८ उमेदवार अनुपस्थित राहिले. तर पेपर दोनची परीक्षा ३८ केंद्रांवर घेण्यात आला. पेपर दोनला १३ हजार ५७७ परीक्षार्थींपैकी ११ हजार ९२५ उमेदवार हजर होते. तर १६५२ विद्यार्थी गैरहजर राहिले. पेपर एकमधील बालमानसशास्त्र विषयावर आधारित प्रश्न समजून घेऊन ते अचूकरित्या सोडवताना भावी शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली. तर पेपर दोनमधील समाजशास्त्र, इतिहास या विषयांवरील प्रश्नांची काठिण्यपातळी जास्त होती. त्यामुळे मागील टीईटी परीक्षांच्या निकालासारखाच याही परीक्षेच्या निकालाची टक्केवारी कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही परीक्षा केंद्र शोधताना परीक्षार्थी धावपळ झाली. तर काही परीक्षा केंद्रावर उशीरा आल्यामुळे अनेक परीक्षार्थींना परीक्षेला मुकावे लागले.