आदित्य ठाकरेंनी बांधलेला नाशिकमधील ‘तो’ पूल गेला पाण्यात वाहून

शेंद्रीपाडा आणि रावळपाडा यांना जोडणारा आदित्य ठाकरे यांनी बांधलेला पूलही पाण्याखाली गेला. यामुळे त्या पुलाच मोठं नुकसान झालं असून पुन्हा आता त्याठिकाणी जैसेथे परीस्थिती निर्माण झाली आहे

नाशिक : काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील हरसूल तालुक्यातील सावरपाडा, शेंद्रीपाडा या दोन पाड्यांना जोडण्यासाठी कोणतेही वाट नव्हती म्हणून या भागातील आदिवासी महिलांना लाकडी ओंडक्यावरून जाऊन 30 फूट खोल तास नदी पार करावी लागत होती. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत त्याठिकाणी तातडीने एक लोखंडी पूल उभारला होता. मात्र मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसात तास नदीला पूर येऊन तो लोखंडी पूल पाण्याखाली गेला, त्यानंतर तो वाहून गेला. त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनीही नाराजी व्यक्त केलीय. शेंद्रीपाड्याचे ग्रामस्थ अंबादास गांगुर्डे यांनी प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केलीय.

लोखंडी पूल पहिल्या पावसात वाहून गेलाय, आम्ही अगोदरच सांगितले होते की, पूल उंच आणि मोठा करा, पण यंत्रणेने कोणताही विचार आणि अभ्यास न करता पूल बांधून दिला होता. उन्हाळ्यात आमची सोय झाली, पण आता पूलच वाहून गेल्याने पुन्हा लाकडी बल्लीवरून आम्हाला प्रवास करावा लागणार असल्याचं शेंद्रीपाड्याचे ग्रामस्थ अंबादास गांगुर्डे यांनी सांगितलं आहे.

खरं तर हरसूल हा प्रचंड पर्जन्यमान असलेला तालुका मात्र उन्हाळ्याच्या दिवसात येथील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अक्षरशः काही किलोमीटर पायपीट करत पाणी आणावे लागते. शेंद्रीपाडा आणि रावळपाडा येथील महिलांनाही उन्हाळ्याच्या दिवसात मोठी पायपीट करून पिण्याचं पाणी मिळवावे लागते. त्यातच त्यांना 30 फूट खोल असलेली तास नदीही पार करून पाणी आणावे लागत होते. याबाबतचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचीच दखल तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली.

या आदिवासी महिलांची व्यथा समजताच आदित्य यांनी त्यांच्या नाशिक मधील सहकाऱ्यांना तात्काळ त्याठिकाणी भेट देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर स्वखर्चातून त्या ठिकाणी लाकडी ओंडका टाकून महिला ये-जा करत होत्या, त्याठिकाणी त्यांनी एक लोखंडी पूल बांधून दिला. मात्र मागील आठवड्यात हरसूलसह संपूर्ण जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आणि या मुसळधार पावसामुळे छोट्या मोठ्या सर्वच नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले. यातच शेंद्रीपाडा आणि रावळपाडा यांना जोडणारा आदित्य ठाकरे यांनी बांधलेला पूलही पाण्याखाली गेला. यामुळे त्या पुलाच मोठं नुकसान झालं असून पुन्हा आता त्याठिकाणी जैसेथे परीस्थिती निर्माण झाली आहे.