जिल्ह्यातील तीन हजार शाळांची वाजली घंटा

विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह; मित्र-मैत्रिणींच्या भेटीने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हास्य

नाशिक ः जिल्ह्यातील तीन हजार शाळांची सोमवारी (दि.4) घंटा वाजली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये कमालिचा उत्साह दिसून आला. तसेच शाळांनीही त्यांच्या स्वागतासाठी सर्वोतोपरी तयारी केल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील 2800 तर शहरातील 227 शाळांमध्ये सोमवारी नियमितपणे वर्ग भरले.

नाशिक जिल्हयात पाचवी ते सातवीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या 1093 व माध्यमिक शाळांना जोडून असलेल्या 1709 शाळा आहेत. कोरोना संसर्गाच्या उद्रेकानंतर सरकारने सर्व शिक्षणसंस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नाशिक जिल्हयातील आठवी ते बारावीचे वर्ग एक जानेवारीपासून सुरू करण्यात आले. मार्चमध्ये दुसर्‍या लाटेच्या उद्रेकानंतर शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कोरोना हॉटस्पॉट नसलेली गावे सोडून इतर ठिकाणी शाळा सुरू झाल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असल्याने शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू करण्यास परवानगी दिली. यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. अनेक शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. सरकारने या विद्यार्थ्यांना पहिले पंधरा दिवस शाळांची सवय लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पहिले काही दिवस विदयार्थ्यांना शाळेत रुळवले जाणार आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुासर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2800 शाळांमध्ये सोमवारी (दि.4) पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू झाले. माध्यमिक शाळांना जोडून असलेल्या पाचवी ते सातवीचे वर्ग तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पाचवी ते सातवीचे विद्यार्थी जवळपास दीड वर्षांनंतर शाळेत आल्याने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक ओट्यावरची शाळा या उप्रकमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात होतेच, आता या शाळा वर्गात भरणार आहेत, अशी माहिती प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.

 जिल्ह्यातील जिल्हापरिषद व खासगी शाळांमध्ये पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या 2 लाख 59 हजार 984 आहे, त्यात पहिल्या दिवशी एक लाख 35 हजार 811 विद्यार्थी शाळेत आले. शालेय शिक्षण विभागाने शाळा 50 टक्के मर्यादेत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी निम्मे विद्यार्थी हजर राहिले. शाळेत 50 टक्के विद्यार्थी संख्या प्रमाण राखण्यासाठी विदयार्थी दर दिवसा आड शाळेत येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.