बालसुधारगृहातून पळालेल्या मुलगा सापडला भद्रकालीत

मनमाड बालसुधारगृहातून पळून गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी एकास भद्रकाली पोलिसांनी रविवारी (दि.१५) काझीगडी, कुंभारवाडा येथून ताब्यात घेतले. तो गंभीर गुन्ह्यातील आरोपाखाली बालसुधारगृहात दाखल झाला होता. तो २९ ऑक्टोंबर २०२१ रोजी पळून गेला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, बालसुधारगृहात घरातून पळून आलेले, निराधार आणि वेगवेगळ्या गुन्ह्यात आढळून आलेल्या अल्पवयीन मुलांना ठेवले जाते. नाशिक शहरातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना न्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते.

निरीक्षण गृहाचे मदतनीस योगेश प्रकाश बोदडे २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी मुलांना नाष्टा देण्यासाठी बालसुधारगृहाचे दोन्ही दरवाज्यांचे कुलूप उघडून आतमध्ये गेले. त्यावेळी दरवाजे उघडे असल्याचा फायदा घेवून चार विधीसंघर्षित बालकांनी त्यांच्या अंगावर धावून येत त्यांना मारहाण करून पळ काढला. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फरार बालकांपैकी एकजण भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काझीगडी, कुंभारवाडा येथे रहावयास असल्याने त्याचा शोध होण्यासाठी मनमाड पोलीस ठाण्यास कळविले होते. त्यानुसार भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर निकुभ यांना एक बालक जाकीर हुसेन हॉस्पिटलशेजारील गार्डन, कथडा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला मनमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस हवालदार आर. एन. निकम, पोलीस नाईक विशाल काठे व गोरख साळुंके यांनी केली.