प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या पतीचा केला खून

नाशिक : प्रेमसंबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा प्रेयसीसमोरच प्रियकराने कोयत्याने सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १८) रात्री ८.३० वाजता महादेवपूर शिवार, मोंढे फार्म रस्ता, धूपकर यांच्या प्लॉटमध्ये घडली. पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व कोयता जप्त केला आहे. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी प्रेयसीने नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रियकर संदीप पोपट गोतरणे (रा.मुक्त विद्यापीठ, गोवर्धन, नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वसंता जयराम झांजर (वय ४१, रा. बोरीपाडा, पो. चिंचओहळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप गोतरणे यांचे मृत वसंता यांच्या पत्नीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पत्नीचे संदीप गोतरणेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती वसंता झांजर यांना मिळाली. झांजर हे बुधवारी रात्री पत्र्याच्या खोलीत पत्नीशी बोलत होते. त्यावेळी तिचा प्रियकर गोतरणे म्हणाला, ‘तू तिला माझ्याशी बोलायला आणि भेटायला का नाही म्हणतो. आमचे प्रेमसंबंध आहेत. तू आमच्या रस्त्यात का येतो. आज तुला संपवूनच टाकतो’, असे म्हणत त्याने कोयत्याने वसंतवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रियकर गोतरणे यास अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव करत आहेत.