कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा बिगूल वाजला

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर सहकार विभागातील निवडणुकांचा बिगूल वाजला असून नाशिक जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. यात पिंपळगाव बसवंत, नाशिक, लासलगाव, घोटी, दिंडोरी, सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, नांदगाव,मनमाड या बाजार समित्यांचा समावेश आहे. मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी तर मतमोजणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. विशेष म्हणजे मतदार याद्यांमध्ये शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच या निवडणूका होतील.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश बाजार समित्यांना दिलेे आहेत.

जिल्ह्यात एकूण 17 बाजार समित्या आहेत. त्यापैकी नामपूर, सटाणा व उमराणे या तीन बाजार समित्यांची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. उर्वरित 14 बाजार समित्यांची निवडणूक आता होत आहे. यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत कायदेशिर प्रक्रिया बघितल्यानंतर निर्णय घेतला जाईल. मात्र, निवडणूक प्रक्रियेत बाधा न येण्याची शक्याता वर्तवली जाते.

निवडणूक कार्यक्रम

  • २३ डिसेंबर २०२२ : निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे
  • २३ ते २९ डिसेंबर २०२२ : नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी
  • ३० डिसेंबर २०२२ : उमेदवारी अर्जांची छाननी
  • 2 जानेवारी 2023 : छाननीनंतर वैध अर्जांची यादी प्रसिध्द करणे
  • 2 ते 16 जानेवारी 2023 : उमेदवारी अर्ज मागे घेणे
  • 17 जानेवारी 2023 : उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे
  • 29 जानेवारी 2023 : मतदान
  • 30 जानेवारी 2023 : मतमोजणी