मॉर्निंग वॉक करणार्‍या जीवलग मित्रांना बसने चिरडले

एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; तिसरा बचावला

Vaibhav Dayma

मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याने जात असताना भरधाव बसने दोन जिवलग मित्रांना चिरडल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी ६.३० वाजेदरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव येथील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली. या अपघातात शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला. राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी झाला. अपघातात सोमनाथ गायकवाड थोडक्यात बचावला.

तीन जीवलग मित्र वैभव दायमा, राकेश वाघाले व सोमनाथ गायकवाड नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ६ वाजेदरम्यान मुंबई-आग्रा महामार्गाजवळून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. तिघेजण रस्त्याच्या कडेने गप्पा मारत जात होते. ते रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात वैभवचा जागीचा मृत्यू झाला असून राकेश गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर चालक बस घेवून फरार झाला. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ करत आहेत.