घरमहाराष्ट्रनाशिकउमेदवारी अर्जासाठी चिल्लरचा स्टंट फसला

उमेदवारी अर्जासाठी चिल्लरचा स्टंट फसला

Subscribe

अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी नाशिक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, २५ हजारांची अनामत रक्कम भरण्यासाठी  १० हजार रूपयांची चिल्लर आणली होती.

नाशिक कोण नेमकं काय करील याचा नेम नाही. सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. असाच काहीसा प्रकार मंगळवारी (दि.९) नाशिकमध्ये घडला. अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी नाशिक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, २५ हजारांची अनामत रक्कम भरण्यासाठी  १० हजार रूपयांची चिल्लर आणली. मात्र, यंत्रणेने त्यांनाच चिल्लर मोजण्यास सांगितले. एक, पाच, दहा रुपयांची नाणी मोजताना सायंकाळचे पाच वाजले. अखेर थकलेल्या उमेदवाराने रक्कम न भरताच कार्यालयातून काढता पाय घेतला.

मकरंद अनासपुरे याचा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात अनासपुरे निवडणूक अर्ज करायला जातो आणि तेव्हा अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क चिल्लरच्या गोण्या भरून निवडणूक यंत्रणेसमोर ठेवतो. चिल्लर मोजताना यंत्रणेची पुरती दमछाक होते. या चित्रपटाला साजेशा असाच प्रकार आज जिल्हाधिकारी कार्यालयात घडला. नाशिक, दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. यावेळी दुपारी अडीचला शिवाजी वाघ नामक इच्छुकाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत निवडणूक अधिकार्‍यांसमोर अर्ज सादर केला. त्याबरोबर अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची चिल्लर त्यांच्या पुढ्यात ठेवली. ही चिल्लर पाहून यंत्रणेला घामच फुटला. दरम्यान अनामत म्हणून आणलेली रक्कम तपासून मगच भरावी, अशा सूचना अधिकार्‍यांनी वाघ यांना दिल्या. तसेच रक्कम कमी भरल्यास आपण स्वतः त्यास जबाबदार राहू , असा अर्जही लिहून देण्यास सांगितले. मात्र दोन तास चिल्लर मोजून या उमेदवाराने अखेर अर्ज न भरता कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे हा केवळ स्टंट असल्याचे दिसून आले. मात्र, यंत्रणेने या उमेदवाराचा डाव परतवून लावत त्यालाच घाम फोडला.

- Advertisement -

गत निवडणुकीची पुनरावृत्ती

गत लोकसभा निवडणुकीत बहुजन स्वराज्य महासंघाचे उमेदवार प्रमोद नाथेकर यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी साडेबारा हजार रुपये रकमेची चिल्लर आणली होती. यावेळी ही रक्कम मोजायला साडेचार तास लागले होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्‍या सामान्य माणसांच्या वेळेचे महत्व काय असते, हे दाखवून देण्यासाठी मी चिल्लर आणल्याचे नाथेकर यांनी सांगितले होते. गत निवडणुकीतून धडा घेत यंदा यंत्रणेने उमेदवारालाच चिल्लर मोजायला लावत घाम फोडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -