इंदिरानगर बोगद्याजवळ कार पुलावरून खाली कोसळली

भीषण अपघातात वाहन चक्काचूर नशीब बलवत्तर म्हणून दोन महिलांसह प्रवासी बचावले

नवीन नाशिक : मुंबई-नाशिक महामार्ग उड्डाण पुलावर मुंबई कडून धुळ्याला भरधाव वेगाने जात असलेली किया सोनेट कार (क्र.एम एच ४६ बी झेड ६०११) ही कार हॉटेल दिव्य अभिलाशा समोरील पूल चढत असताना कारचालकाचे नियंत्रण सुटून कार पलटी होत पुलावरून खाली कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असला तरी सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.

हायवेच्या बाजूला लावलेला पत्रा गाडीच्या आतल्या बाजूला घुसलेला होता तो अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काढला. अपघात इतका भीषण होता की संरक्षित पत्र गाडीच्या आरपार घुसला होता, नशीब इतक बलवत्तर की इतका भीषण अपघात होऊनही कुठलीही जीवित हानी झाली नाही.

पालघर येथील सुनील जैन व त्यांच्या सोबत दोन महिला या गाडीतून प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस तसेच अग्निशामक दलाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशामक दलाच्या बचाव पथकाचे अधिकारी शाम राऊत, कर्मचारी ज्ञानेश्वर दराडे, सोमनाथ थोरात, किशोर पाटील, विजय शिंदे,सायली काथवटे यांनी घटनास्थळी बचावकार्य केले. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.