कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या ‘त्या’ माजी सैनिकाच्या मृतदेहाच्या केसचा अखेर उलघडा

नाशिक : कारने कट मारल्याने कारचालक व दुचाकीचालकांमधील वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात दुचाकीचालकासह एका अल्पवयीन मुलाने कारचालकाचा चॉपरने वार करुन खून केला. त्यानंतर कारसह चालकाचा मृतदेह डिझेल टाकून जाळल्याची धक्क्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दुचाकीचालकासह एका अल्पवयीन मुलास अटक केली आहे. आकाश चंद्रकांत भोईर (वय २४, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) याच्यासह एका विधीसंर्षित बालकास अटक केली आहे. संदीप पुंजाराम गुंजाळ (रा. न्हनावे, ता. चांदवड, जि. नाशिक) असे मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.

घोटी पोलीस ठाणेहद्दीतील आंबेवाडी गावचे शिवारात ३० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान वन विभागाच्या हद्दीत रस्त्यावर एक जळालेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. जळालेल्या चारचाकी हुंदाई सॅन्ट्रो कारच्या अवशेषावरून कार संदीप पुंजाराम गुंजाळ यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए सॅम्पल घेण्यात आले होते. रासायनिक विश्लेेषणानुसार व जबाबावरून घोटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांना संदीप गुंजाळ हे समृध्दी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी येथे सिक्युरिटीचे काम असल्याची माहिती मिळाली होती. ३० ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्रीचे सुमारास ते साउथ पोल समृध्दी महामार्ग येथून कार घेवून गेले होते. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आंबेवाडी शिवारात मिळून आला होता. पोलीस पथकाने संदीप गुंजाळ हे सिक्युरीटी म्हणून काम करत असलेल्या समृध्दी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी या ठिकाणी भेट दिली. समृध्दी महामार्गाचे कामगार, सिक्युरिटी गार्डस् व ऑफीस स्टाफ यांना चेक करून संदीप गुंजाळांबाबत विचारपूस केली.

गुंजाळ हे घटनेच्या दिवशी मध्यरात्री कारने भावली धरण परिसराकडे गेले असल्याचे पोलिसांना समजले. त्याप्रमाणे पोलिसांनी कारचा मागोवा घेवून भावली धरण परिसरात माहिती घेतली असता घटनेच्या दिवशी गुंजाळ गाडी चालवीत असताना त्याचे नांदगाव सदो येथील एका दुचाकीवरील तरुणांशी कट मारल्याचे कारणावरून भांडण झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी नांदगाव सदो शिवारातून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खून केल्याचे कबूल केले.

असा केला खून

 सहा महीन्यांपूर्वी समृध्दी महामार्गाचे पूलाखाली सर्कलजवळून नांदगाव सदो गावाकडे स्प्लेंडरने जात असताना समोरून एका सॅन्ट्रो कारने कट मारला म्हणून कारचालक गुंजाळ यास शिवीगाळ केली. त्यामुळे त्याने गाडी थांबवून व खाली उतरून आम्हाला शिवीगाळ केली. त्यातून आमच्यात भांडण झाले. राग अनावर झाल्याने दोघांनी चॉपरने गुंजाळ पोटावर वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यास कारमध्ये टाकून भावली धरणाचे दिशेने घाटात नेले. निर्मनुष्य ठिकाणी कार थांबवून त्यास ड्रायव्हर सीटवर बसवले. त्याच्या कारमधील डिझेल कॅन त्याच्या अंगावर व कारवर ओतून देत पेटवून दिले.