केंद्र सरकारचे महाराष्ट्राच्या कांद्याकडे दुर्लक्ष

देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणार्‍या महाराष्ट्रातील कांद्यासाठी निर्यातबंदी उठवण्याची मागणी होत असताना केंद्र सरकारने फक्त तामिळनाडूतील कृष्णपुरम कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कांद्याची आवक वाढून किंमती घसरण्याचा सिलसिला सुरुच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांडवड, निफाड, येवला, नांदगाव, देवळा या तालुक्यांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. बाजारात कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भाव पंधराशे रुपये क्विंटलपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे कांदा निर्यात खुली करण्यासाठी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना विनंती केली होती. मात्र, केंद्र सरकारने केवळ तामिळनाडू येथील कृष्णपुरम कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. यातही केवळ चेन्नई बंदरातून फक्त 10 हजार टन कांदा पाठवण्याचे बंधन घातले आहे. यामुळे स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढून किमती कोसळण्याची भिती व्यक्त केली जाते. केंद्र सरकारने यापूर्वी सप्टेंबरमध्ये कांद्याची निर्यांत बंद केली होती.