Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम विधीसंघर्षग्रस्त बालकांना समाजप्रवाहात आणण्याचे आव्हान

विधीसंघर्षग्रस्त बालकांना समाजप्रवाहात आणण्याचे आव्हान

Subscribe

कायद्याविरोधातील घटनांमध्ये वाढता सहभाग चिंताजनक; पालकांसह प्रत्येक घटकाचे योगदान अपेक्षित

साईप्रसाद पाटील । नाशिक

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नसताना पोलिसांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकालाच आता सजग होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. विशेष म्हणजे, विधीसंघर्षग्रस्त बालकांचे कायद्याविरुद्ध वर्तन रोखण्याचे आजघडीला मोठे आव्हान उभे राहिले असल्याने पालकांसह शिक्षक, नातेवाईक, पोलीस व समाजातील सर्वच घटनांना अधिक जबाबदारीने वर्तन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. नाशकात गेल्या काही कायद्याविरोधातील घटनांतील विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश पाहता त्यांच्यासाठी आता विशेष समुपदेशन केंद्र, अभ्यासपूर्ण मनोरंजन केंद्र उभे राहणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ज्यासाठी सामाजिक संस्था, विशेष अधिकारी, दातृत्वशील व्यक्तींनी पुढाकार घेतल्यास नाशकातून विधीसंघर्षग्रस्त बालकांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकेल.

- Advertisement -

पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, अंबडमधील गेल्या काही घटनांवरून विधीसंघर्षग्रस्त बालकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. अशा स्थितीत पालकांची तसेच पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जाते. मात्र, याही पलिकडे जाऊन अशा बालकांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच घटकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. अशा बालकांचे वेळोवेळी समुपदेशन करणे, त्यांच्या संपर्कात राहणे, कायद्याची, आरोग्याची, योग्य वर्तणुकीची समज वेळोवेळी दिली जावी, सोशल मीडिया-मोबाईल- टीव्हीपासून बालकांना वेळीच रोखल्यास त्यांना आभासी दुनियेपासून दूर ठेवता येईल, जेणेकरून आपसूकच विधीसंघर्षीत बालकांचे प्रमाण कमी होऊन कायदेविरोधातील घटनांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.

पंचवटी, नाशिकरोड परिसरातील तिघा विधीसंघर्षीत बालकांनी शस्त्र बाळगळ्याची घटना नुकतीच समोर आली होती. अशा बालकांकडून रागासंतापात, अनावधानाने अशी चूक केली गेली असली तरी योग्यवेळी योग्य पावले उचलली गेल्यास त्यांना रोखणे शक्य होते, हे विसरून चालणार नाही. पोलिसांनी या बालकांना ताब्यात घेत, त्यांच्या आई, मावशीसमक्ष समज दिली. यानंतर या बालकांना बालसुधार गृहातही समुपदेशित करण्यात आले. अंबडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका विधीसंघर्षित बालकाकडे अत्यंत घातक शस्त्रे आढळली. ही शस्त्रे त्याने स्वत:हून घेतली नसली, तरी एका सराईताने ती त्याच्याकडे लपवायला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. एका गुन्हेगारामुळे या विधीसंघर्षित बालकालाही शिकण्याच्या वयात पोलीस दप्तरी कारवाईला सामोरे जावे लागले, हे दुर्दैवच.

- Advertisement -

अशा घटना यापूर्वीही घडल्या असल्याने त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. वाईट संगत ही नेहमी वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करते, याचा प्रत्यय आजवर अनेकदा आलाय, त्यामुळे पालकांनीही वेळोवेळी आपल्या पाल्याचे निरीक्षण करून त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. शाळकरी, तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याही वर्तणुकीकडे पालकांनी लक्ष ठेवून शिक्षकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. जेणेकरून मुलांच्या अभ्यास, वर्तणूक आणि मित्रांबाबत त्यांना वेळोवेळी माहिती मिळू शकेल, असा सल्ला मानसतज्ज्ञांसह पोलीस अधिकारी, बालसुधारगृहातील अधिकारी व तज्ज्ञ समुपदेशक देतात. त्याचा विचार होणे गरजेचे आहे.

या उपाययोजना शक्य

 • कोणत्याही समस्येचे समूळ उच्चाटन होणे सोपे नसते. परंतू काही उपायांतून निश्चितच मार्ग निघू शकतो.
 • विधीसंघर्षग्रस्त बालकांविषयीच्या समस्येतही योग्य उपायययोजना तज्ज्ञांसह वैद्यकीय तसेच पोलीस अधिकार्‍यांकडून सूचविल्या जातात. त्यांचा विचार व्हावा.
 • कुटुंब तसेच कुटुंबाबाहेरील ज्येष्ठांनी वाईट सवयी लागलेल्या मुलांचा त्वरित बंदोबस्त करावा. तज्ज्ञ समुपदेशकाची मदत घ्यावी.
 • राजकारणात मुलांचा सहभाग नको.
 • रिकाम्या वेळात मुलांना मोबाईल, टीव्हीचा अतिरेक न करू देता त्यांना खेळ, तसेच अन्य कलागुणांची जोपसाना करण्याच्या दृष्टीने गुंतवून ठेवावे. त्यांना क्रियाशील ठेवावे.
 • विधीसंघर्षग्रस्त बालके आढळण्याचे प्रमाण अलिकडे शहरात जास्त असल्याने अधिक लक्ष शहरांवरच केंद्रीत केले पाहिजे.
 • झोपडपट्ट्या आणि इतर छोट्या वस्त्यांवर लक्ष केंद्रित करून त्याठिकाणी विधीसंघर्षित बालकांसाठी मनोरंजन केंद्र, मार्गदर्शन केंद्रांचा विचार केला जावा. यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग हवा.
 • मुलांना व्यसनांपासून दूर ठेवावे.
 • मुलांबरोबरच पालकांचेही वेळोवेळी समुपदेशन व्हावे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे. कुटुंबनियोजन, कुटुंब शिक्षण, आरोग्यविषयी मार्गदर्शन दिले जावे.
 • गुन्हेगारीची कारणे शोधणे व दुसरीकडे त्या माहितीच्या आधारे सुधार केंद्रे, मार्गदर्शन केंद्र चालवली गेल्यास समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे ठरेल.
 • प्रत्येक शाळांतून पालक-शिक्षकांची संयुक्त मंडळे स्थापन करुन त्याद्वारे शाळेतून पळून जाणार्‍या वा गैरहजर राहणार्‍या मुलांची नोंद सातत्याने ठेवली जावी, अशा मुलांबाबत पालकांसह समुपदेशक, पोलिसांसारख्या जबाबदार व्यक्तींना कल्पना द्यायला हवी.

आभासी दुनियेपासून मुलांना ठेवा दूर

सध्याच्या परिस्थितीत मुलांमध्ये वाढत असलेली हिंसा, उर्मटपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यात पालकांची भूमिका पोलिसांपेक्षा महत्त्वाची ठरेल, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जातेय. कौटुंबिक स्तरावर प्रयत्न करुनही पाल्याच्या वागण्यात सुधारणा नसेल, तर समुपदेशनाचा पर्याय योग्य ठरेल. मुलांशी संवाद हे सर्वाधिक महत्त्वाचे औषध ठरते. मुलांच्या बदलत्या सवयींवर पालकांबरोबरच शिक्षकांनीही लक्ष ठेवणे, त्याची कल्पना देणे अत्यंत गरजेचे आहे. सोशल मीडिया, टीव्ही, मोबाईलचा अतिरेक नको, याचेही भान ठेवले गेल्यास मुले वाईट संगतींपासून आपसूकच दुरावतील. मुलांना चित्रपट, सिरीजमधील आभासी दुनियेपासून दूर ठेवले पाहिजे. या दुनियेविषयी त्यांना कल्पना देत राहिले पाहिजे. मुलांना अध्यात्म, बलोपासना, कलोपासनेची शिकवण द्यावी, जेणेकरून ते शिस्तप्रिय बनतील.

विधीसंघर्षग्रस्त बालके वाढण्याची कारणे

 • वाईट संगत
 • विघटीत कुटुंबे
 • चित्रपट, वेबसिरीज, अश्लिल साहित्य
 • पालकांचे अतिदारिद्य्र
 • सावत्र आई-वडिलांकडून चुकीची वागणूत
 • मानसिक आजार
 • मोबाईल, तसेच इंटरनेटचा अतिरेक
 • एकटेपणा, चिडचिडपणा
- Advertisment -