शहरात गावठी कट्ट्यांचा बोलबाला; पंचवटीत एकाला अटक

नाशिक : शहरात गुन्हेगारी डोके वर काढले असून, बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणे व शहारात विक्री करण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत. मखमलाबादमध्ये गावठी कट्टा शहरात आणून विक्री करणार्‍या तिघांना दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने अटक केली आहे. चिन्मय केशव काकड (२६ रा. काकड मळा, जुना चांदशी रोड, मखमलाबाद रोड, नाशिक), रितेश अनिल बागूल (रा. आडगाव नाका, पंचवटी) व राज प्रल्हाद मदोरिया उर्फ प्रिन्स (रा. जाधव कॉलनी, पंचवटी) अशी तिघा संशयितांची नावे आहेत.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या सुचनेनुसार दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने गावठी कट्टे बाळगणार्‍यांची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी (दि. ११) पथकाचे हवालदार विजयकुमार सुर्यवंशी यांना म्हसरूळहद्दीत चिन्मय काकड याच्याकडे गावठी कट्टा असून, तो मखमलाबाद गावात येणार असल्याची माहिती कळाली. त्यानुसार पथकाचे सहायक निरीक्षक किरण रौंदळे व हवालदार शमशुद्दीन शेख, पोलीस नाईक श्रीशैल सवळी, मोहन देशमुख, अंमलदार कडूबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, विशाल जोशी यांनी सापळा रचून चिन्मयला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्या ताब्यात एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, १ निकामी पुंगळी मिळून आली.

तसेच रितेश बागूल व राज मदोरिया यांनी गावठी कट्टा व काडतुसांची खरेदी-विक्री केल्याचे समोर आले आहे. तिघांविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मखमलाबादमध्ये अनेक नवीन वसाहती निर्माण होत आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढत असताना गुन्हेगारीदेखील वाढत आहे. गेल्या आठवड्यात शांतीनगर भागात चायनीज हातगाडीचालकांकडून पैसे मागितल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना ताजी आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.