बाधितांच्या घरी जाऊन होणार तपासणी

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाला आता खडबडून जाग आली आहे. त्यामुळे आता शहरातील सहाही विभागांमधील कोरोना बाधित रुग्णाच्या घरी जाऊन विशेष पथक तपासणी करणार आहे.

हे पथक ‘होम आयसोलेशन’ सुविधाही तपासणार आहे. या मोहिमेत पालिकेचे वैद्यकीय पथक अचानक रुग्णाच्या घरी जाईल. या ठिकाणी रुग्ण घरगुती अलगीकरणात व्यवस्थितपणे राहत आहे का, त्याच्याकडून अन्य व्यक्तीला संसर्ग होत नाही ना याची पाहणी करेल. त्याची प्राथमिक तपासणी करून तो ज्या वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत उपचार घेत आहेत ते योग्य आहे का याची पडताळणी केली जाईल. होम आयसोलेशन बाबत अडचण असल्यास संबंधित रुग्णाला सरकारी रुग्णालयात वा त्याची आर्थिक परिस्थिती बघून तो खाजगी रुग्णालयात दाखल होण्यास तयार असल्यास अशा ठिकाणी हलविले जाईल. हातावर क्वारटाईनचा शिक्का मारल्यानंतरही जे रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. पाच व्यक्तींचे हे पथक असेल.

पालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या टेस्ट

महापालिका मुख्यालयात दररोज हजारो लोक कामाच्या निमित्ताने हजेरी लावतात. अधिकारी व कर्मचार्‍यांचा संबंध येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून किंवा लोकांकडून अधिकार्‍यांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी सर्वांचीचं आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.