रस्त्यावर विनाहेल्मेट दिसताच दुचाकीसह चालकाची होणार ‘उचलबांगडी’

गुरुवारपासून अंमलबजावणी, दोन तास समुपदेशानंतरच मिळणार दुचाकी

Helmet_Drive
प्रातिनिधीक फोटो

नाशिक शहरात बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासह अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेनंतर आता अनोखी शक्कल लढवली आहे. हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार (दि. ९) पासून पोलीस विनाहेल्मेट दुचाकीचालकाचे वाहन ताब्यात घेण्यात येणार असून, चालकांना पोलीस वाहनातून ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे समुपदेशनासाठी नेले जाणार आहे. विशेष म्हणजे, या पार्कमध्ये दोन तासांचे समुपदेशन पूर्ण केल्यानंतर चालकास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच वाहन सोडले जाणार आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू कली आहे. शहरात शासनाच्या जुन्या परिपत्रकाची अंमलबजावणी करत १५ ऑगस्ट रोजी या उपक्रमाला प्रारंभ झाला. सुरुवातीचे दोन दिवस दुचाकीचालकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलीस आयुक्तांनी या मोहिमेची कडक अंमलबाजवणी करण्याची सूचना पंपचालकांना केल्यानंतर प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली.परिणामी, आता ८० टक्के दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच, रस्त्यावर ५० ते ६० टक्के दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत नसल्याचे दिसून आले. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीचालकांचा हेल्मेट परिधान न केल्याने मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हेल्मेट वापराचे प्रमाण वाढण्यासाठी आता विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

अशी होणार अंमलबजावणी

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे चार युनीटनिहाय भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. रस्त्यावर बॅरिकेडिंग लावण्यात येऊन विनाहेल्मेट चालकाची दुचाकी अडवत पुरुष, महिला चालकांचे वाहन ताब्यात घेतले जाणार आहे. संबंधित चालकाला पोलीस वाहनातून समुपदेशनसाठी मुंबई नाका येथील ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये तज्ज्ञांकडून दोन तासांचे समुपदेशन केले जाणार आहे. या समुपदेशनाचे प्रमाणपत्र चालकांना दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच संबंधित चालकाला वाहन परत दिले जाणार आहे.

हेल्मेट वापरा, वेळेचा अपव्यव टाळा

नाशिक शहरात दुचाकी चालविताना दुचाकीचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. हेल्मेट वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. हेल्मेटचा वापर करा, आपला वेळ वाचवा.
दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त