घरमहाराष्ट्रनाशिकशेतजमिनीत फसवणूक : कुटुंबाने मागितली आत्महत्येची परवानगी

शेतजमिनीत फसवणूक : कुटुंबाने मागितली आत्महत्येची परवानगी

Subscribe

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली मागणी

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव वणी येथील मीना ज्ञानेश्वर गटकळ यांच्या कुटुंबाची शेती व्यवहारात फसवणूक झाली आहे. न्याय मिळण्यासाठी दोन वर्षांपासून त्यांनी वणी पोलीस, पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांना अद्यापपावेतो न्याय मिळालेला नाही. अखेर पदरी निराशा आल्याने त्यांनी आपल्याला कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.

तळेगाव वणी येथील गट क्र. १४४ व १४५ गटकळ परिवाराच्या मालकीच्या मिळकतीतील बंगला व ३ हेक्टर शेतजमीन वगळून इतर सर्व मिळकत मुंबईस्थित परेश हरखचंद भायाणी यांच्याशी विक्रीचा व्यवहार झाला होता. मात्र, गटकळ कुटुंबियांना तलाठी नोटीस आल्यानंतर भायाणी फसवणूक करत संपूर्ण क्षेत्र खरेदी करुन घेतल्याचे समजले. १४ ऑक्टोबर २०१९ रोजी वणी पोलिसांनी हे प्रकरण प्रांताधिकारी दिंडोरी यांचेकडे पाठविले. प्रांताधिकार्‍यांनी जो निकाल दिला होता. त्याला न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर तो निकाल गटकळ यांच्या बाजूने लागला. तरीही, त्यांना जागेचा ताबा मिळण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस यंत्रणेने सहकार्य केले नाही. त्यानंतर भायाणी यांनी या जागेच्या कब्जासाठी नाशिक येथील पाच व्यक्तींना १४ फेब्रुवारी २०२०रोजी लिव्ह अ‍ॅन्ड लायसेन्स करारनाका करुन दिला. त्या पाच व्यक्तींसह इतर १० ते १५ गुडांनी १८ फेब्रुवारी २०२० रोजी बंगल्यात घुसून तोडफोड केली. याप्रकरणी २० फेब्रुवारी २०२० रोजी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात तलाठी तळेगाव वणी, मंडळ अधिकारी, तहसीलदार दिंडोरी, प्रांताधिकारी दिंडोरी, पोलीस निरीक्षक वणी, उपविभागीय अधिकारी कळवण आदींनी लाच घेतल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर ज्ञानेश्वर गटकळ, दत्तात्रय गटकळ, मिराबाई गटकळ, तुकाराम गटकळ, ज्योती गटकळ, अतिष गटकळ आदींची स्वाक्षरी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -