घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगोळीबार करणाऱ्या टोळक्याची काढली धिंड

गोळीबार करणाऱ्या टोळक्याची काढली धिंड

Subscribe

नाशिक : पूर्ववैमनस्यातून फुलेनगर परिसरात एका युवकावर हल्ला करत गोळीबार करणार्‍या तीन आरोपींच्या पंचवटी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांची पोलिसांनी मंगळवारी (दि.२१) फुलेनगर परिसरातून धिंड काढली. पोलिसांनी आरोपींची जिथे दहशत तिथेच अद्दल घडविली. शिवाय, पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करत आरोपींच्या दहशतीचा बिमोड केला. यावेळी फुलेनगर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम महाले हा मित्रासोबत शनिवारी (दि.११) फुलेनगर भागातील मुंजोबा चौकात उभा होता. त्यावेळी त्याठिकाणी संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, संदीप आहिरे, जय खरात यांनी त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. हा हल्ला चुकवून प्रेम महाले याने घराच्या दिशेने धाव घेतली. संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करून महाले याच्या घराच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या गोळीबारात उषा महाले यांना गोळी लागली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली.

- Advertisement -

पोलिसांनी संशयित विशाल उर्फ विकी विनोद वाघ,जय संतोष खरात,संदीप आहिरे या तिघांना ताब्यात घेतले. विकी वाघ याची अंगझडतीत घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे संशयितांनी सांगितल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या तिघांची नागरिकांच्या मनातून दहशत कमी व्हावी, या उद्देशाने घटनास्थळी नेत परिसरातून धिंड काढली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, गुन्हे शोध कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -