घरमहाराष्ट्रनाशिकछटपूजेवर यंदाही कोरोनामुळे संक्रांत

छटपूजेवर यंदाही कोरोनामुळे संक्रांत

Subscribe

घरीच पूजन करण्याचे पोलिसांकडून आवाहन

पंचवटी : उत्तर भारतीयांत पवित्र मानल्या गेलेल्या छटपूजा उत्सवास शासनाने परवानगी नाकारल्याने सलग दुसर्‍या वर्षी हा उत्सव घरगुती स्वरूपातच साजरा करावा लागणार आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत सार्वजनिक छटपुजेेऐवजी स्थानिक ठिकाणीच म्हणजे घरीच पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान गंगाघाटावर गर्दी होऊ नये म्हणून रामकुंडाकडे येणार्‍या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग लावण्यात येणार असल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका अद्यापही कायम असल्याने महाराष्ट्र शासनाने सार्वजनिकरित्या साजर्‍या होणार्‍या छटपूजा व सूर्याला अर्घ्य देण्याच्या पारंपरिक उत्सवाला परवानगी नाकारली आहे. मात्र, त्यानंतर उत्तर भारतीयांत संभ्रमावस्था कायम होती. त्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक डॉ. कोल्हे यांच्या दालनात शासन निर्णय सांगण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात सामाजिक कार्यकर्ते पद्माकर पाटील, महंत भक्तीचरणदास, गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष उमापती ओझा, गोविंद झा, रवी सोनार, सोनू कनोजिया, हिरालाल परदेशी, प्रकाश चव्हाण, भुवालसिंग, जयकृष्ण दवे, मनपाचे पंचवटी विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांच्यासह उत्तर भारतीयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत शासनाच्या निर्देशानुसार उत्तर भारतीय समाजबांधवांनी गंगाघाटावर न येता घरच्याघरीच छटपूजा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -