घरमहाराष्ट्रनाशिकदेशभक्तीपर गीतांनी निनादले नाशिक महापालिकेचे मुुख्यालय

देशभक्तीपर गीतांनी निनादले नाशिक महापालिकेचे मुुख्यालय

Subscribe

नाशिक : देशभक्तीपर गाणी, ढोल ताशांचा गजर आणि एनसीसी कॅडेट्सच्या गाण्यांनी महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवन क्रांतीदिनी (दि. ९) राष्ट्रभक्तीने भारावले होते. यावेळी निघालेल्या सायकल रॅलीलादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत स्वराज्य महोत्सवामध्ये महापालिकेतर्फे राजीव गांधी भवन येथे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे आणि अशोक आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी शिवताल ढोल-ताशा पथकाने आपली कला सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. अतिशय लयबद्ध आणि उत्साहपूर्ण सादरणीकरणामुळे पथकातील सदस्यांना उत्स्फूर्त दाद लाभली. एसव्हीकेटी, एचपीटी, बीवायके या महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनेही देशभक्तीपर विविध गाणी सादर केली. त्यातून उपस्थितांनी देशभक्तीचा रोमांच अनुभवला.

महापालिकेचे कार्यकारी अभियंता रवी बागूल आणि कर्मचारी गुणवंत वाघ यांनीही देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमानंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. कॅनडा कॉर्नर, शरणपूर पोलिस चौकी, मायको सर्कल अशा मार्गाने पुढे गोल्फ क्लबला सायकल रॅलीचा समारोप झाला. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी 75 सायकलिस्टने रॅलीत सहभाग घेतला होता. सायकल रॅलीच्या पाठोपाठ जीपची थार रॅलीही निघाली. टॉर्क आरपीएम 15 आणि ग्रेप सिटी ऑफ रोड या ग्रुपने थार रॅलीत सहभाग घेतला होता. लायन्स क्लब नाशिक मेट्रोचे पदाधिकारी, शिवताल ढोल-ताशा पथकाचे नारायण जाधव, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, थार रॅलीत सहभागी ग्रुपचे हर्षद कडभाने तसेच सुभेदार हरीश वानिया, सुभेदार चैनसिंह राजपुरोहीत यांचा सत्कार सुरेश खाडे व अशोक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. सेवासाधना फाऊंडेशनचे दीपक भगत, राम कदम, रुपेश पाटील, कल्पेश खाडे हे देखील यावेळी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेच्या मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई आणि मुख्य दरवाजाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नववर्ष स्वागत समितीच्या सदस्यांनी काढलेल्या विविधरंगी आकर्षक रांगोळीने पालिका मुख्यालयाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. ध्वजस्तंभ आणि परिसरदेखील फुलांनी सजवण्यात आला आहे. एलईडी स्क्रिनवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -