घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेतील कोरोनाबाधित कर्मचार्‍यांच्या माहितीची दडवादडवी

महापालिकेतील कोरोनाबाधित कर्मचार्‍यांच्या माहितीची दडवादडवी

Subscribe

३० विभागांत १३ कर्मचारी मृत; उर्वरित विभागांचे तोंडावर बोट

शहरातील कोरोनाबाधत मृतांच्या आकड्यांची महापालिका प्रशासनाकडून लपवाछपव सुरु असतानाच आता महापालिकेतील करोनाबळी कर्मचार्‍यांचीही माहिती दडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या महासभेत यासंदर्भात मनसेचे नगरसेवक सलिम शेख यांनी माहिती विचारली असता आरोग्य, वैद्यकीय आणि घनकचरा विभागाने टोलवाटोलवी करीत अनभिज्ञता दर्शवली. त्यानंतर विभागप्रमुखांना माहिती सादर करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले असता ३८ पैकी केवळ ३० विभागांनी माहिती सादर केली. त्यात १३ कर्मचारी मृत झाल्याचे सांगण्यात आले आहे. पालिकेतील तीन प्रमुख विभागांनी प्रशासनाकडे मृत कर्मचार्‍यांची माहिती सादरच केली नसल्याने या विभागांकडून करोनाबळींची आकडेवारी लपविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महासभेत नगरसेवकांनी महापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांच्या संख्येबाबत जाब विचारल्यानंतर गेल्या आठवड्यात प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी सर्व ३८ विभागांना करोनाबळींची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, त्याला आठवडा उलटून गेला, तरी ही पुरेशी माहिती सादर झालेली नाही. सदरची माहिती दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश देत कर्मचार्‍याचा मृत्यू झालेला दिनांक आणि त्याचा करोना पॉझिटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक केले होते. परंतु, प्रशासनाने दिलेल्या आदेशाला करोना फ्रंटलाइन ठरलेल्या प्रमुख विभागांनीच केराची टोपली दाखविली आहे. आठवडाभरात ३८ पैकी ३० विभागांनी माहिती सादर केली असून, त्यात १३ जणांचा करोनामुळे बळी गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

मृत १३ पैकी घनकचरा विभागाचे पाच, पंचवटी विभागीय कार्यालयाचे पाच, तर जलतरण विभाग, नाशिक पूर्व कार्यालय, विद्युत व यांत्रिकी विभागामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे मृतांची नोंद झाली आहे. कोरोना फ्रटंलाइन म्हणून काम करणारे वैद्यकीय, सार्वजनिक बांधकाम, लेखा विभाग, शिक्षण, नवीन नाशिक या विभागांनी अद्यापही त्यांच्याकडे असलेल्या मृतांची माहिती प्रशासनाला दिलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -