घरताज्या घडामोडीचिमुकलीचे अपहरण करणारा पोलिसांच्या जाळ्यात

चिमुकलीचे अपहरण करणारा पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

गावी सोडून देण्याचे आमिष दाखवून १२ वर्षीय चिमुकलीचे जळगाव येथून अपहरण करणार्‍या संशयितास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने नाशिकरोड परिसरातून ताब्यात घेतले. गणेश सखाराम बांगर (३२, रा.मालेगाव, जिल्हा वाशिम) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने १९ मे रोजी जळगाव येथून बालिकेचे अपहरण केले होते. याप्रकरणी जळगाव येथील नशिराबाद पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

विदर्भातील अकोला येथे जाण्यासाठी एक कुटूंब मुंबईहून पायी निघाले होते. ते जळगावातील एका मंदिरात जेवण करत होते. त्यावेळी संशयित गणेश याने १९ वर्षीय मुलासोबत संवाद साधत त्यांना गावी सोडवण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तो मुलगा त्याच्या १२ वर्षीय मुलीसह त्याच्या दुचाकीवर बसले. त्याने नशिराबाद ते भुसावळ महामार्गावर दुचाकी थांबवली. पुढे पोलीस आहेत, आपल्यावर कारवाई होऊ शकते, असा त्याने बहाणा केला. तु पायी चालत ये, आम्ही पुढे थांबतो, असे त्याने मुलास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत तो दुचाकीवरुन उतरला. त्यानंतर त्याने मुलीसह दुचाकी अमरावतीच्या दिशेेने नेली. २० मे रोजी मुलीला अमरावतीत सोडून तो फरार झाला.

- Advertisement -

अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुलीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संशयित गणेश पुणे येथून नाशिकला येत असल्याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी नाशिक शहर गुन्हे शाखेशी संपर्क साधत माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयित गणेश यास नाशिकरोड परिसरातून ताब्यात घेत त्यास जळगाव पोलिसांकडे सोपवले. त्याच्याविरोधात चोरी, अपहरण, फसवणूक, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहरातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, पोलीस कर्मचारी रवींद्र बागुल, विशाल काठे, विशाल देवरे आदींच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -