घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांच्या जीवाची लाही लाही; पारा ४० अंशांवर

नाशिककरांच्या जीवाची लाही लाही; पारा ४० अंशांवर

Subscribe

नाशिक : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, दोन दिवसांपासून पारा ३८ अंशांवर जाऊन पोहोचल्याने नाशिककरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच बुधवारी (दि.१०) नाशिक शहरात कमाल तापमान 40.2 अंश तर, किमान तपमान 23.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे दुपारी बाहेर निघणे कठीण बनले होते. आरोग्य प्रशासनानेही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांत नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळी सात वाजेपासून वार्‍याचा वेग मंदावून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. यामुळे नाशिककर घामाघूम होत आहेत. कमाल तापमान 40.2 अंश तर किमान तपमान 23.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. नाशिकचे कमाल तापमान दहा दिवसांपासून 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या जवळपास स्थिरावत होते, तर कमाल तापमान 12 से 21 अंशांच्या आसपास असायचे. मात्र, अचानकपणे कमाल किमान तापमानाने उसळी घेतली आहे. याचा परिणाम वातावरणावर झालेला दिसून येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, ऊन वाढल्याने दुपारी बारा वाजेपासून चार वाजेपर्यंत शहरासह उपनगरांमधील रस्त्यांवरील वर्दळ मंदावलेली दिसून येत आहे. नाशिककरांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळले. पुढील पाच दिवस उन्हाचा तडाखा अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांना नाशिक हवेहवेसे वाटत असे. परंतू गेल्या काही वर्षांपासून नाशिकचा पाराही वाढू लागला आहे. त्यातच कधी अवकाळी तर कधी उन्हाचा कडाका यामुळे वातावरणातील बदल नाशिककर अनुभवत आहेत. येत्या शनिवारपर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. किमान तापमानातही वाढ होत असल्यामुळे नागरिकांना सायंकाळी सुद्धा उकाड्याचा सामना करावा लागत आहे. रात्रीची झोप घेण्यासाठी नागरिकांकडून कुलर, पंखे, वातानुकूलित यंत्राचा आधार घेतला जात आहे.

वाढत्या उकाड्यामुळे नाशिककर मागील दोन दिवसांपासून हैराण झाले आहेत. रात्री नागरिक घराबाहेर उशिरापर्यंत फेरफटका मारण्यास पसंती देत आहेत. उन्हाची वाढलेली तीव्रता आणि उकाड्यामुळे थंड गुणधर्माची फळे, व शीतपेय, आईस्क्रीम कुल्फीलाही मागणी वाढली आहे. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी बाहेर पडणे टाळावे, उपरणे, गॉगल्स वापरावेत, नागरिकांनी उन्हापासुन बचाव करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -